esakal | जाणून घ्या: काय आहे ‘पन्हाळा,पावनखिंड पदभ्रमंती’ मोहीम?
sakal

बोलून बातमी शोधा

Panhala to Pavankhind trekking

जाणून घ्या: काय आहे ‘पन्हाळा,पावनखिंड पदभ्रमंती’ मोहीम?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही सलग दुसऱ्या वर्षी ‘पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती’ (Panhala to Pavankhind trekking) मोहीम रद्द करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशनच्या मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे घेण्यात आला. दरवर्षी सुमारे ५० हजार मोहीमवीर या मोहिमांमध्ये सहभागी होतात. काय आहे ही मोहीम? काय आहे पन्हाळा-पावनखिंड रणसंग्रामाचा धगधगता इतिहास आणि भूगोल, याचा घेतलेला वेध.(panhala-to-pavankhind-trekking-information-kolhapur-marathi-news)

राष्ट्रप्रेमाचा परमोच्च आविष्कार

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शौर्य, साहस, पराक्रम, राष्ट्रप्रेम, शूर मावळ्यांची निष्ठा या साऱ्यांचा परमोच्च आविष्कार म्हणजे पावनखिंड संग्राम.

नरवीर बाजी प्रभूदेशपांडे, वीररत्न शिवा काशीद, फुलाजी प्रभूदेशपांडे, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांच्यासह बांदल मावळ्यांच्या बलिदानाने हा संग्राम बनला

महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत.

आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री सुरू झालेला हा रणसंग्राम दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत चालला.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटणे आणि शत्रूशी सामना झालाच तर त्याला नामोहरम करणे, हाच या रणसंग्रामाचा मुख्य उद्देश.

गटागटाने केवळ सहाशे मावळ्यांनी बलाढ्य शत्रूला रणसंग्रामात केले चितपट.

हेही वाचा- स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड

गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर

सह्याद्रीचा स्थानिक भूगोल आणि नैसर्गिक संरक्षक डोंगररांगा व एकूणच निसर्गाच्या आविष्काराचा युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पकतेने वापर केला.

पन्हाळा व विशाळगडाचे भौगोलिक स्थान, दिवस मोठा आणि रात्र लहान अशा सर्व गोष्टींचा विचार करून मोहिमेची आखणी.

टेहळणी करूनच झाली मार्ग आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची निश्चिती.

शत्रू कोठूनही आला तरी त्याच्याशी चौके (पांढरपाणी) येथेच भिडावे लागणार, हे गृहीत धरूनच मोर्चेबांधणी.

गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा जगातील सर्वोत्कृष्ट आदर्श.

शत्रूला गाफील ठेवण्याची रचना

नियोजित मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचेपर्यंत शत्रूला गाफील ठेवण्यासाठी केलेली व्यूहरचनाही या रणसंग्रामाचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज शरणागती पत्करणार, असे जाणीवपूर्वक चित्र निर्माण केले गेले. शिवाजी महाराज शत्रूला सापडले, अशी आवई उठवणे आणि महाराज कुठे गेले हे कुणालाच कळू न देणे, या तीन गोष्टींवर त्यामध्ये भर देण्यात आला.

यांच्या स्मृतीला वंदन

‘राजे म्हणून जन्माला आलो नाही; पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले’ असा संदेश देणारे वीर शिवा काशीद आणि ‘लाख मेले तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे,’ असा संदेश देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह या रणसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या मावळ्यांना वंदन करण्यासाठी प्रत्येक वर्षी पन्हाळा-पावनखिंड मोहिमांचे आयोजन होते. यंदाही मोहिमा होणार नसल्या, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रणसंग्रामाची अनुभूती दिली जाणार आहे.

पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभे करणारा शिवचरित्रातील महत्त्वाचा रणसंग्राम आहे. याच शौर्यशाली इतिहासाला नमन करण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो शिवभक्त मोहिमांत सहभागी होतात. या मोहिमेचा मार्ग आणि नकाशा निश्चितीमध्ये प्रसिद्ध इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांचे मोलाचे योगदान राहिले. मोहिमेतून शौर्यशाली इतिहासाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती, त्याचे नियोजन कसे व्हायचे इथपासून ते स्थानिक भूगोलाचा वापर कसा करून घेतला गेला, अशा विविध अंगांनी नव्या पिढीला हा रणसंग्राम माहिती व्हायला हवा.

- डॉ. अमर अडके, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशन

loading image