esakal | Video - कोरोनामुक्तीसाठी प्लाझ्मादान गरजेचे; दानशूरांची संख्या कमी

बोलून बातमी शोधा

null

Video - कोरोनामुक्तीसाठी प्लाझ्मादान गरजेचे; दानशूरांची संख्या कमी

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : सौम्य स्वरूपाच्या कोरोना रुग्णांवर गेल्या वर्षी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरली. आताही रुग्णांवर याचा उपयोग केला जातो, मात्र महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढली आहे, त्या तुलनेत प्लाझ्मादात्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या तरुणांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी विशिष्ट कालावधीनंतर प्लाझ्मा देणे गरजेचे आहे. मात्र, प्लाझ्माबद्दल मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याने नागरिक प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत नाहीत. प्लाझ्मा दिल्यावर अशक्तपणा येईल का? पुन्हा कोरोना होणार नाही ना? आजारी पडलो तर? असे अनेक गैरसमज आहेत; मात्र प्लाझ्मा देणे सुरक्षित असून, त्याचा कोणताही अपाय होत नाही. सध्या वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्लाझ्म्याची कमतरता भासत आहे.

हेही वाचा: गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

प्लाझ्मा म्हणजे काय?

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केल्यावर त्याच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रक्तातील प्लाझ्मा काढून या अँटिबॉडीज शरीरातून घेतल्या जातात. त्यानंतर समान रक्तगटाच्या कोरोना रुग्णाला त्या अँटिबॉडीज दिल्या जातात. त्यामुळे त्याच्या शरीरातील कोविडचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे रुग्ण कमी कालावधीत बरा होतो.

असा घेतात प्लाझ्मा

व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. त्याचवेळी यंत्राद्वारे रक्तातील प्लाझ्मा वेगळा केला जातो. प्लाझ्मा घेतल्यावर रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात जाते. अशाप्रकारे रक्तातील केवळ प्लाझ्मा घेतला जातो.

कोण करू शकतो प्लाझ्मादान

  • कोरोनामुक्त झालेला रुग्ण अहवाल निगेटिव्ह आल्याच्या ४२ दिवसांनंतर

  • १८ ते ५० वयोगटातील कोरोनामुक्त रुग्ण

  • शरीर निरोगी असावे, कोणतीही व्याधी नको

  • अँटिबॉडीज तपासून मगच व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो

हेही वाचा: घेतली लस, आता बिनधास्त बंदोबस्त!

"प्लाझ्मा थेरपी सौम्य स्वरूपाचा कोरोना असणाऱ्या रुग्णांना लाभदायक आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. प्लाझ्मा देण्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे कोणताही गैरसमज मनात न बाळगता कोरोनामुक्त झालेल्या तरुणांनी प्लाझ्मादान करावे."

- डॉ. वरुण बाफना, रक्तविकार तज्ज्ञ, सीपीआर

"कोरोनामुक्त झाल्यावर मी प्लाझ्मादान केले. मला कोणताही त्रास झाला नाही. ना अशक्तपणा आला ना मी पुन्हा आजारी पडलो. प्लाझ्मा देणे ही आता समाजाची गरज आहे. त्यामुळे बिनधास्त प्लाझ्मादान करा."

- विजय वाणी, प्लाझ्मा दाता