
कोल्हापूर - अंगात वर्दी घालायचीच, हेच स्वप्न त्यांनी शाळेत एनसीसीत असतानाच मनाशी बाळगले. आजी, आजोबा, मामा मामीच्या मिळालेल्या लाखमोलाच्या साथीने त्यांनी घरच्या परिस्थितीवर मात केली. पार्टटाईम नोकरी करीत पदवी घेतली.
खासगी नोकरी करीत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. एक-दोन नव्हे, पाच ते सहा शासकीय खात्यांत त्यांची निवड झाली. पण, त्यांनी त्याचा त्याग करीत २०१२ मध्ये परीक्षेत यश मिळवत वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक ते सहायक पोलिस निरीक्षकपदाची धुरा सांभाळताना त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात केले. एक-दोन नव्हे, तर सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. अशा या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील शीतलकुमार डोईजड यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
घरच्या परिस्थितीमुळे करत होते पार्ट टाईम नोकरी
दिंडनेर्ली हे शीतलकुमार अनिल डोईजड यांच्या मामांचे गाव. जन्मापासून ते याच गावी आजी सावित्री, आजोबा दिनकर, मामा शिवानंद व मामी मनीषा शेटे यांच्या छायेत वाढले. शालेय शिक्षण येथील विद्यामंदिर आणि ईश्वरा वाडकर हायस्कूल येथे घेतले. महाविद्यालय शिक्षण महाराष्ट्र व न्यू कॉलेज येथे
झाले. घरच्या परिस्थितीमुळे पार्ट टाईम नोकरी करत त्यांनी बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. छोट्या खासगी नोकरी करत असताना त्यांना वर्दीचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी सैन्य व पोलिस भरतीसाठी प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. नाराज न होता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात २०११ मध्ये त्यांना यश मिळाले. त्यांना राष्ट्रीयकृत बॅंक, शासनाच्या महसूल आणि मंत्रालयापर्यंतील लिपिक पदाची नेमणूक मिळाली. दरम्यान त्यांनी पोलिस उपनिरीक्षक परीक्षा दिली होती. त्यात यश मिळणार याची त्यांना खात्री होती. याच आत्मविश्वासावर त्यांनी इतर शासकीय नोकऱ्यांकडे पाठफिरवली. अखेर त्यांची २०१२ मध्ये एमपीएससी परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
करवीर तालुक्यातील तरूणांचे आयडॉल
नाशिक येथे शीतलकुमार यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दामरनचा येथे विनंती अर्जाद्वारे बदली करून घेतली. त्यांनी येथील पोलिस ठाण्याचे दोन वर्षे प्रभारी पद सांभाळले. त्यांना परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र कदम, तत्कालिन अधीक्षक सुवेझ हक, संदीप पाटील, डॉ. अभिनव देशमुख, आयपीएस शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. हक हे त्यांचे प्ररेणास्थान. भागात नक्षलवाद्यी एकत्रित हल्ला करायचे. गनिमीकाव्याने त्यांचा प्रतिकार पोलिसांना करावा लागत होता. जानेवारी २०१६ मध्ये त्यांनी सहकाऱ्यांसमवेत नक्षलवाद्यांच्या छावणीवर हल्ला केला. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. महिन्याच्या अंतराने झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादांना यमसदनी पाठवले. कालांतराने त्यांची बदली विरार येथे झाली. पण त्यांनी पुन्हा नक्षलवादी भागात आपली बदली करून घेतली. सध्या ते ‘सी ६०’ दलात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०१८ ला राष्ट्रपती शोर्य पदक जाहीर केले. नुकतेच त्यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या जीगरबाज शीतलकुमार डोईजड हे करवीर तालुक्यातील तरूणांचे आयडॉल बनले आहेत.
आजी, आजोबा, मामा, मामींचे संस्कार, प्रोत्साहन त्याला मिळालेले आई-वडीलांचे आशिर्वादाने हे यश गाठता आले. कर्तव्ये, जबाबदाऱ्याबरोबर वंचित घटकासाठी काम करण्याचा मानस आहे.
- शीतलकुमार डोईजड, सहायक पोलिस निरीक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.