राजकीय घडामोडींना वेग; तयारी विधान परिषदेची, जोडण्या नगरपालिकेच्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

राजकीय घडामोडींना वेग; तयारी विधान परिषदेची, जोडण्या नगरपालिकेच्या

जयसिंगपूर : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडी ढवळून निघाल्या आहेत. तयारी विधान परिषद निवडणुकीची सुरू असली तरी व्यूहरचना मात्र तोंडावर असलेल्या नगरपालिका निवडणुकीची सुरू असल्याचे चित्र पालिकांमध्ये आहे. सोयीच्या राजकारणातून इच्छुक उमेदवारांकडून पालिकेसाठी ‘शब्द’ वदवून घेण्याच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारांची मात्र कोंडी होतानाही दिसत आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेपाठोपाठ जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुलही वाजणार आहेत. याच संधीचा लाभ उठवत नगरपालिका निवडणुकीत बहुमताच्या बाजूने कूच करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरू केली आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने संभाव्य उमेदवारांनी विजयासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. नगरपालिकांमधील गट नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विरोध कमी करण्याबरोबर सोयीच्या राजकारणातून उमेदवारांपुढे अनेक प्रस्ताव आणले जात आहेत. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांच्या गाठीभेट घेतल्या जात असताना आता 'शब्द' पाळायचा कोणाचा या चक्रव्यूहात उमेदवार सापडले आहेत.

हेही वाचा: जयंतरावांचे 'ते' खेळ सुरू राहणार?

जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमधील हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यातील नऊ जुन्या नगपालिकांमधील नगरसेवकांची मुदत १४ डिसेंबरला संपत आहे. एक डिसेंबर या अर्हता तारखेवर मतदार यादी तयार करण्याचे आदेश झाल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि तत्कालीन आमदार महादेव महाडिक यांच्यात लढत झाली होती.

तब्बल अठरा वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या महाडिक यांचा पराभव केल्यानंतर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही महाडिक यांच्याकडून सत्ता काबीज केली. गोकुळच्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी महाडिक यांना विधान परिषदेच्या निमित्ताने चालून आली आहे. पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातील चुरस याआधीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा: विधान परिषदेसाठी कोल्हापुरात भाजपकडून अमल महाडिक

नगरपालिकेवरील सत्तासंघर्षाचे दर्शन

महाडिक यांच्या वतीने उमेदवार बदलला तरी चुरस मात्र सतेज पाटील विरुद्ध महादेव महाडिक अशीच समजली जाणार आहे. याचाच परिणाम यावेळच्या निवडणुकीतही मोठा रंग भरणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेवरील सत्तासंघर्षही पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच नगरपालिकांच्या निवडणुकीच्या घडामोडींना प्रारंभ झाला आहे.

loading image
go to top