
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता. आज राधानगरी धरणातून २५०० क्युसेक विसर्ग करण्यात आला. तर कुंभी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३०० क्युसेक विसर्ग केला. त्यामुळे पंचगंगा आणि कुंभी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. शहर आणि परिसरातही दुपारी दोन ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते.