esakal | कोल्हापुरातील मंत्री खोटारडे; सरकारला गुडघे टेकायलाच लावू
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

शेतकऱ्यांनी पुरात कसाबसा आपला जीव वाचविला आहे. पण, त्यानंतर मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना मरणकळा सहन कराव्या लागत आहेत.

कोल्हापुरातील मंत्री खोटारडे; सरकारला गुडघे टेकायलाच लावू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रयाग चिखली (कोल्हापूर) : सव्वा महिन्यानंतरही अतितातडीची मदत मिळालेली नाही, तरीही पूरग्रस्तांचे पैसे बॅंक खात्यावर पाठविल्याचे सांगून कोल्हापुरातील मंत्री खोटे बोलत आहेत. शासनाने आणि मंत्र्यांनी खोटे बोलणे बंद करावे. शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, लघुउद्योजकांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज दिला. कोल्हापूर आणि सांगली (Kolhapur,Sangli) जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रयाग चिखली (Prayag Chikhali) (ता. करवीर) येथून पंचगंगा परिक्रमेला सुरुवात झाली. रविवारी (ता. ५) नृसिंहवाडी येथे सायंकाळी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत.

शेट्टी यांनी सकाळी सव्वाआठला प्रयाग संगमावरील दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक केला. सकाळी साडेसातपासूनच परिसरातील शेतकरी प्रयाग चिखली येथे येत होते. घरातून भाजी-भाकरी व इतर जेवणाचे साहित्य, कपडे घेऊनच शेतकरी बाहेर पडले. पावणेअकराला परिक्रमेला सुरुवात झाली. हातात झेंडे व तोंडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देत शेतकरी कार्यकर्त्यांनी प्रयाग चिखली सोडले. संघटनेचे कार्यकर्ते प्रयाग चिखली, आंबेवाडी येथे आल्यावर तेथील महिलांनी कार्यकर्त्यांच्या पायावर पाणी घालून औक्षण केले व परिक्रमेला बळ दिले.

शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांनी पुरात कसाबसा आपला जीव वाचविला आहे. पण, त्यानंतर मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना मरणकळा सहन कराव्या लागत आहेत. २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाने पूरग्रस्तांना आठ दिवसांच्या आत मदत केली नाही, तर जलसमाधी करण्याचा इशारा दिला होता. आजपर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. याचा फटका शेतकरी, उद्योजक, छोटे व्यापारी, व्यावसायिकांसह इतर घटकांना बसला आहे. पण, सरकारला याची जाणीव नाही.

शासनाला आणि कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या मंत्र्यांना अजून चार दिवसांची मुदत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि गेल्या वर्षी प्रामाणिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपये तत्काळ मिळावे, आम्ही पाऊस, पुरातून वाचलो; पण आता केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या धोरणात अडकलो, तरीही तुम्हाला गुडघे टेकायला लावू, अशा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, अजित पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू

प्रमुख मागण्या :

- २०१९ प्रमाणे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

- पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा

- कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करा

- भराव असणाऱ्या ठिकाणी तातडीने कमानी, पूल बांधावेत

- पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे सरसकट शैक्षणिक शुल्क आणि कर्ज माफ करा

- २००५ ते २०२१ पर्यंत चार वेळा महापूर आला, यासाठी कायमस्वरूपी उपाय करावेत

- महापुराचे पाणी ज्या गावात आले, त्या गावांना पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करा

- कृषीविम्याची रक्कम तत्काळ मिळावी

राजू शेट्टी म्हणाले,

* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आश्‍वासने दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीनंतर कोल्हापूर जिल्हा दौरा केला. या वेळी तत्काळ मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. दौऱ्यानंतर मात्र अजूनही शेतकरी आणि व्यावसायिक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

* पंचनामे पूर्ण होऊन मंत्री खोटे बोलतात

जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. तरीही, शासनाकडून शेतकऱ्यांना मदत द्यायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. एकीकडे शेतकरी मरत असताना सरकार मात्र वेळकाढूपणा करत आहे.

* मंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा

पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संयम बाळगा म्हणून सांगणाऱ्या मंत्र्यांनीच पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना बाळगली पाहिजे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

अशी असणार परिक्रमा :

१ सप्टेंबरला प्रयाग चिखली येथून सुरुवात, तर शिये (ता. करवीर) येथे मुक्काम केला जाईल. २ सप्टेंबरला चोकाक (ता. हातकणंगले) येथे, ३ सप्टेंबरला पट्टण कोडोली येथे, ४ सप्टेंबरला अब्बुललाट येथे आणि ५ सप्टेंबरला दुपारी चारपर्यंत नृसिंहवाडी येथे जाऊन जलसमाधी घेतली जाईल. पंचगंगा नदीच्या मार्गावरूनच परिक्रमा केली जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

* भूसुरुंग आणि अतिक्रमणामुळे महापूर :

गौण खनिजासाठी भूसुरुंग लावले जातात. त्यामुळे डोंगरांना भेगा पडल्या आहेत. यातच पावसाळ्यात मोठ्या दरडी कोसळताना दिसत आहेत. नदीपात्र किंवा पूररेषेत मोठी बांधकामे केल्याने किंवा भराव टाकल्याने महापूर शहर आणि गावात शिरत आहे. याला मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकारी जबाबदार आहेत.

* कार्यकर्त्यांना भाजी-भाकरी :

चिखली, आंबेवाडी गावातील अनेक महिलांनी कार्यकर्त्यांचे औक्षण केल्यावर सोबत आणलेली भाजी-भाकरीही त्यांना दिली. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला.

वडणगेत स्वागत

वडणगे : आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही काही सरकारचे घरगडी नाही, असा घणाघात माजी खासदार राजू शेट्टी यांनी वडणगे (ता. करवीर) येथे केला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. दुपारी या पदयात्रेचे वडणगेत आगमन झाले. ग्रामस्थांनी पदयात्रेचे स्वागत केले. पार्वती मंदिर परिसरात शेट्टी यांची सभा झाली. सरपंच सचिन चौगले, करवीर पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित पाटील यांनी या पदयात्रेला पाठिंबा दर्शविला. या वेळी बी. एच. पाटील, राजू पोवार, वैभव कांबळे, सचिन शिंदे, जनार्दन पाटील, शैलेश चौगले, सागर शेटे, महावीर चौगुले, महेश खराडे, संजय बेले आदी उपस्थित होते.

loading image
go to top