
...तर सत्तेचा डोलारा कोसळेल; राजू शेट्टी यांचे शरद पवार यांना पत्र
जयसिंगपूर - शेतकरी (Farmer) व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही. अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख करणारे पत्र (Letter) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पाठवले आहे. महाविकास आघाडीच्या कारभाराचा पाढाच त्यात वाचला आहे.
श्री. शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे की, महाविकास धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोटे-मोठे पक्ष यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. वैचारिक बांधिलकीमुळे हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करू शकत नाहीत, या त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन महाआघाडीतील मोठे पक्ष त्यांना गृहित धरत आहेत.
हेही वाचा: ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण
ऊसदर नियंत्रण समिती ही समिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस सरकारने ही समिती स्थापन करताना ऊसदरासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश त्यात केला होता. महाविकास आघाडी सरकारने मात्र चळवळीची कुठलीही पार्श्वभूमी नसेलेले आणि स्थानिक कारखानदारांच्या दबावात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश केला. तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याच्या नीती आयोगाच्या प्रस्तावावर राज्य सरकारने कसलीही चर्चा न करता समर्थन करणारा अभिप्राय कळविल्याचे शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीशी फारकत घेण्याची वेळ आमच्यावर आली की काय, असे वाटू लागले आहे. सरकारवरील विश्वासास तडा जात आहे. आघाडीचे प्रमुख या नात्याने या सर्व गोष्टींना आपण वेळीच सावरले नाहीत, तर आघाडीचा डोलारा ढासळायला वेळ लागणार नाही.
- राजू शेट्टी, माजी खासदार
शेट्टींच्या पत्रातील ठळक मुद्दे...
महापूर, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत
किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीस परवानगी देत शेतकऱ्याला बदनाम केले
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदानाची प्रतीक्षा
वसुलीसाठी महावितरणने वीज तोडल्यामुळे पिके करपून लागली
वाझे प्रकरण, आरोग्य भरती, पेपर फुटी, टीईटी घोटाळ्यात सरकार गुरफटले
Web Title: Raju Shetty Letter To Sharad Pawar Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..