Ratnagiri : अंगारकीला पोहणार्‍यांवर करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri ganeshotsav

Ratnagiri : अंगारकीला पोहणार्‍यांवर करडी नजर

रत्नागिरी : पुढील आठवड्यात १३ सप्टेंबरला अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीपुळ्यात ४० हजारांहून अधिक भक्तगण दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. उत्सव सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले. प्रशासनाकडून दर्शनासाठी भक्तांची व्यवस्था केली असून, समुद्रकिनाऱ्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. समुद्र खळवलेला असून, या परिसरात चाळ तयार झालेला आहे. पोहायला जाणाऱ्यांवर रोख लावण्यासाठी जीवरक्षकांसह पोलिसांचा ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.

शासनाने मागील काही महिन्यांपासून कोरोनातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे अंगारकीला श्रीक्षेत्र गणपतीपुळेत भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे येथे आढावा बैठक झाली. या वेळी देवस्थानाचे सरपंच डॉ. विवेक भिडे, तहसीलदार शशिकांत जाधव, जयगड पोलिस, आरटीओ, देवस्थानाचे मुख्य पुजारी अभिजित धनवटकर, सचिव विनायक राऊत, ग्रामपंचायत, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य विभाग यांच्यासह महसूल विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणपतीपुळेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, वाहतूककोंडी टाळणे याबाबत पोलिस, आरटीओ आणि ग्रामपंचायतीने व्यवस्था करण्याच्या सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या. दर्शनासाठी भाविकांना घेऊन येणार्‍या बसेसच्या पार्किंगची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जाईल. मंदिर परिसरात स्वच्छता व दिवाबत्तीची सोय ही जबाबदारी मंदिर व्यवस्थापन व ग्रामपंचायतींकडे दिली गेली. आरोग्य विभागाने व महावितरण विभागाने २४ तास पथकं तैनात ठेवावीत, आवश्यक तो औषधसाठा, डॉक्टर, रुग्णवाहिका उपस्थित ठेवण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. जेएसडब्ल्यू व पालिकेचे अग्रीशमक बंब येथे सज्ज ठेवले जातील. हॉटेल संघटना, ग्रामपंचायत, देवस्थान संस्थान यांनी एकत्रित येऊन कामकाज करावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.

अंगारकीला सर्वसाधारणपणे ३५ ते ४० हजार भक्तगण दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने वर्तवली आहे. कोरोनानंतर यापूर्वी एप्रिलमध्ये अंगारकी येऊन गेल्यामुळे या वेळी थोडी गर्दी कमी राहील. दर्शनानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी धाव घेतात. गेल्या काही दिवसात पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळलेला आहे. गणपतीपुळे दूरक्षेत्राच्या मागील बाजूस समुद्रात खड्डा (चाळ) तयार झाला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायतीचे दहा व एमटीडीसीचे चार असे जीवरक्षक तैनात ठेवले जातील. किनार्‍यावरील व्यावसायिकांची सागरी सुरक्षारक्षक म्हणून पोलिसांनी नेमणूक केली आहे. त्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फायबर बोट ठेवण्यासाठी चर्चा

चाळ तयार होत असलेल्या भागात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने तो भाग ‘रेड झोन’ केला. तरीही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी एक फायबर बोट ठेवण्याबाबत पाऊल टाकले आहे. जेट स्की ठेवण्यासाठीही चर्चा सुरू होती. किनाऱ्यावर पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

Web Title: Ratnagiri Ganeshotsav 2022 Lifeguards Police Boats Ready Ganesh Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..