esakal | कोल्हापूरतील धरणक्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरतील धरणक्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस

कोल्हापूरतील धरणक्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस

sakal_logo
By
लुमाकांत नलावडे

कोल्हापूर : धरणक्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, कमी कालावधीत अधिक पाऊस यामुळेच जिल्ह्यातील पाऊस यंदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाचे गणित बिघडले आहे. निसर्गचक्रच बदलाचा हा परिणाम दिसून येत आहे. २०१९ मध्ये २५ जुलै ते १० ऑगस्ट पडलेला पाऊस यंदा केवळ २१ ते २५ जुलै दरम्यान झाला. राधानगरी धरणात दिवसांत ४५० मिलिमीटर होणारा पाऊस ५७५ मिलिमीटरपर्यंत पोचला.

वारणा धरणातील पाऊस ४२५ वरून ५७४ मिलिमीटरपर्यंत पोचला. पाणलोट क्षेत्रात, तर दिवसाला ३५० मिलिमीटर पाऊस झाला. २०१९ मध्ये तो १२५ ते १५० पर्यंत होता. २०१९च्या तुलनेत दीडपट पाऊस झाला असला तरीही एकूण सरासरी नेहमीच आहे. कमी कालावधीत अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा जूनमध्ये पाऊस नोंद घेण्यासारखा झाला. जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने २४ जुलैपर्यंत दाणादाण उडविली. तुळशी धरणाचा विचार करता दिवसात ८९५ मिलिमीटरहून अधिक पाऊस एकाच दिवसांत झाला. यापूर्वी तो ५५७ पर्यंत झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे. २०१९ मध्ये १७ दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर पंचगंगेला महापूर येऊन तेथील पाणी पातळी ५५ फूट सात इंचापर्यंत पोचली होती. २०२१ मध्ये जुलैमध्ये पाच दिवसांत झालेल्या महापुरात पंचगंगेची पातळी ५६ फूट ३ इंचापर्यंत पोचली.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

गतवर्षीपेक्षा यंदा १०० मिमी पाऊस कमीच

जिल्ह्यात जूनपासून आजअखेर १६२७.१ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तो आजअखेर १४२१ मिलिमीटर झाला आहे. म्हणजे ८७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात गतवर्षी आजच्या तारखेला १३०९ .५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे ८०.५ टक्के झाला होता. तुलनेत यावर्षी पाऊस अधिक असल्याचे जाणवत असले तरीही प्रत्यक्षात गतवर्षीपेक्षा यावर्षी अद्याप १०० मिलिमीटर पाऊस कमीच असल्याचे दिसते.

  • जिल्ह्यात कमी कालावधीत अधिक पाऊस

  • गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमीच

  • चार महिन्यांच्या तुलनेतही पाऊस कमीच

  • पाच दिवसांत पंचगंगेची पातळी ५६ फूट ३ इंचापर्यंत

loading image
go to top