esakal | कोवाडजवळील "या' गावात श्रमदानातून केली पाणंद रस्त्याची दुरुस्ती; अबालवृद्धांसह युवकांनी घेतला पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Repair Of Panand Road In Kini Through Villager Kolhapur Marathi News

किणी येथील टेकडीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेबाबत "सकाळ'मधून बातमी प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते.

कोवाडजवळील "या' गावात श्रमदानातून केली पाणंद रस्त्याची दुरुस्ती; अबालवृद्धांसह युवकांनी घेतला पुढाकार

sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : किणी (ता. चंदगड) येथे पाणंद रस्त्याच्या बांधकामासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी रस्त्याच्या बांधकामासाठी प्रयत्न करत नसतील, तर श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करू, या विचाराने आज अबालवृद्धांसह युवकांच्या पुढाकाराने चक्क रस्त्यावर उतरले. चिखलाच्या रस्त्यावर श्रमदानाच्या माध्यमातून दगड टाकून दुरुस्ती केली.

किणी येथील टेकडीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेबाबत "सकाळ'मधून बातमी प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी तरुणांच्या पुढाकाराने रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. संपूर्ण रस्ता चिखलाचा असल्याने या रस्त्यावरून लोकांना ये-जा करताना अडचण येत होती. टेकडीवर वस्ती असलेल्या लोकांची व शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आहे.

रस्ता पक्का नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल होतात. त्यामुळे ग्रामस्थांनी यापूर्वीच्या आमदार, खासदार यांच्याकडे हा प्रश्‍न मांडला होता; पण अद्याप या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला नसल्याने ग्रामस्थांवर चिखलातून जाण्याची वेळ आली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. मातीचा रस्ता असल्याने पावसामुळे रस्त्यावर सध्या चिखल आहे. संपूर्ण रस्त्यावर दगड टाकून ग्रामस्थांनी तत्पूर्वी गैरसोय दूर केली असली तरी रस्त्यावरील वाढती रहदारी विचारात घेता पक्‍क्‍या रस्त्याची गरज आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

loading image
go to top