आता वाजवा घंटा !

दुसरे नाट्यगृह तातडीने व्हावे ; ‘केशवराव’चाही विकास व्हावा
Sambhaji Gandamale writes keshavrao Bhosale theater with capacity of 2500 seats
Sambhaji Gandamale writes keshavrao Bhosale theater with capacity of 2500 seats sakal

‘कोल्हापूर बदलतंय’ अशी बिरुदावली मिरवताना शहरात दुसरे अडीच हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह व्हावे, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी हॉकी स्टेडियमजवळील जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पाच कोटींचा निधी शासनाने मंजूर केल्याचे जाहीर केले. मात्र, पुढे कोरोनामुळे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधीची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच ही कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या निधीतून संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा आता नाट्यगृहाच्या आवारात उभारला जाणार असून, त्याद्वारे कला संस्था व कलाप्रेमींची अनेक वर्षांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.

पन्नास कोटींचा आराखडा

दुसऱ्या नाट्यगृहाच्या आग्रही मागणीनंतर कधी बेलबाग, कधी शिवाजी विद्यापीठ परिसर, तर कधी शाहू मिल आणि त्यानंतर हॉकी स्टेडियम परिसरात नव्या नाट्यगृहाची चर्चा सुरू राहिली. अडीच हजार आसन क्षमतेच्या या नाट्यगृहासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अवघ्या तीन-चार दिवसांत नियोजित आराखड्याचे सादरीकरणही झाले. मात्र, याबाबत कोणताच ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. आराखड्यानुसार अंदाजे ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तळमजल्यावर एकूण खुर्च्या चौदाशे आणि दोन बाल्कनी मिळून अकराशे अशा एकूण अडीच हजार खुर्च्या आणि किमान तीनशे चारचाकींचे पार्किंग करता येईल, एवढे प्रशस्त पार्किंग असा हा आराखडा आहे.

महापालिकेचे पत्र असे...

महापालिकेने २७ फेब्रुवारी २०२० ला मराठी नाट्य परिषदेसह कला संस्था प्रतिनिधींना पत्र दिले आहे. महापालिकेतर्फे नवीन बहुउद्देशीय नाट्यगृहासाठी अडीच हजार बैठक व्यवस्थेसाठी २८,३९२ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळ असलेल्या जागेची आवश्यकता असल्याने महापालिका हद्दीतील हॉकी स्टेडियम येथील आयटी पार्क जवळील जागेचे निश्चित ठिकाण दर्शवणाऱ्या नकाशासह अनुषंगिक सर्व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना २४ फेब्रुवारी २०२० रोजी सहायक संचालक नगररचना विभाग यांना दिले आहे. ही जागा संपादित करण्यासाठी इस्टेट विभागाला कळवले असून, जागा निश्चितीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचेही म्हटले आहे.

‘केशवराव’चा दुसरा टप्पा

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी साडेआठ कोटींहून अधिक निधीचा प्रस्ताव आहे. त्यातून नाट्यगृह, खासबाग मैदान आणि परिसर विकास, साठहून अधिक चारचाकींची अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था, संरक्षक भिंतीसह खाऊ गल्लीचाही सुनियोजित विकास आणि तिकीट खिडकीसह नाट्यगृहांतर्गत विविध सुविधांचा त्यामध्ये समावेश आहे.

अद्ययावत यंत्रणा काय कामाची?

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण परंपरेप्रमाणे पहिल्या टप्प्यातील नूतनीकरणानंतरही त्याचे उत्तरायण गाजू लागले. पहिल्या टप्प्यात झालेले काम पाहता ते अत्यंत देखणे आणि सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. फक्त रंगमंचाचा विचार केला तरी त्याची योग्य जपणूक केली, तर किमान शंभर वर्षे त्याला काही होणार नाही. साउंड आणि लाईट सिस्टीम्स या सध्याच्या सर्वात अद्ययावत सिस्टीम्स असून, त्याची किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांच्या घरात आहे. पण, ही यंत्रणा बऱ्याचदा वादाची ठरली आहे. पूर्वी नाट्यगृहातील वातानुकूलीत यंत्रणेमुळे वारंवार चालू प्रयोग बंद पाडले गेले, तर चार ते पाच वर्षांपासून साउंड सिस्टीममधील बिघाडामुळे नाटकाचे प्रयोग थांबवावे लागत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मग महापालिकेने नाट्यगृहात सुमारे ऐंशी लाख रुपये खर्च करून बसवलेली अद्ययावत डिजिटल यंत्रणा काय कामाची, असा संतप्त सवाल आजही कायम आहे.

मनुष्यबळाची वानवा कायम

नाट्यगृहात अजूनही साउंड ऑपरेटरची नियुक्ती झालेली नाही. अलीकडेच एका उमेदवाराची महापालिकेने मुलाखत घेऊन नियुक्ती केली. पण, एकूणच ड्यूटीचा कालावधी आणि मिळणारा मोबदला यामुळे निवड होऊनही तो ड्यूटीवर हजर झालेला नाही. दोन प्रशासकीय कर्मचारी वगळता तीन शिफ्टसाठी केवळ सातच कर्मचारी येथे असून, नाट्यगृहाच्या स्वच्छतेपासून ते पार्किंग आणि बुकिंगपर्यंत साऱ्या गोष्टी त्यांनाच कराव्या लागतात, हे वास्तव कायम आहे. त्यामुळे तीन शिफ्टसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यालाही प्राधान्य द्यावे लागणार आहे.

सांस्कृतिक गरज म्हणूनच...

शहरातील उद्याने शहराची फुफ्फुसे आहेत, तसेच शहरातील नाट्यगृहे ही शहराची सांस्कृतिक गरज आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न आणि सुविधांसाठीचा खर्च अशी तुलना करून चालणार नाही. शहराची सांस्कृतिक गरज म्हणून नाट्यगृहातील सुविधांकडे पाहणे आवश्यक आहे, ही मूलभूत भावनाच महापालिका प्रशासन अजूनही समजून घेत नाही. त्यामुळेच अवाजवी भाडे स्थानिक संस्थांना भरावे लागते. ही बाब येथील रंगकर्मींसह प्रेक्षकांनीही वारंवार निदर्शनास आणून दिली आहे.

मेंटेनन्सचे धोरण ठरवावे लागेल

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मेंटेनन्सबाबतचे ठोस धोरण अद्यापही ठरलेले नाही. मॅनेजमेंट, हाउसकिपिंग आणि सिक्युरिटीसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पण, पुढे याबाबत कोरोनामुळे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबतही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहात आवश्‍यक इतर सुविधा दुसऱ्या टप्प्यात दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामांनाही आता प्रारंभ होणार आहे. महापालिकेच्या पातळीवर शक्य तेवढी सर्वतोपरी मदत आम्ही संयोजक संस्थांना करत असतो. आणखी काही कुशल मनुष्यबळ मिळाल्यानंतर तांत्रिक त्रुटीही कमी करणे शक्य होईल.

- समीर म्हाब्री, नाट्यगृह व्यवस्थापक

दुसरे नाट्यगृह उभारताना केवळ नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर चित्र, शिल्प अशा विविध कलांचा अनुभव एकाच ठिकाणी घेता येईल, असे बहुउपयोगी नाट्यगृह अपेक्षित आहे. जयप्रभा स्टुडिओशेजारीही महापालिकेची जागा आहे. पूर्वी तेथे दुसऱ्या नाट्यगृहाचा विचार होता. पण, आता या दोन्ही जागा एकत्रित करून बहुउपयोगी नाट्यगृह तसेच कलादालने उभारणेही शक्य आहे.

- पंडित कंदले, नाट्य समीक्षक

अद्ययावत तिकीट विक्री कार्यालय, नाटकांचे बोर्ड लावण्यासाठीची जागा, नाट्यगृहात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशमार्ग, संगीत नाटकांसाठी पडदे, रंगमंचावर आवश्यक इतर मूलभूत सुविधा या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. सध्या आलेल्या निधीतून कामे करण्यापूर्वी नाट्यगृहाशी संबंधित घटकांची बैठक घेऊन काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच प्रशासकांना भेटणार.

- आनंद कुलकर्णी,अध्यक्ष, नाट्य परिषद शाखा

दुसऱ्या नाट्यगृहाची शहराला सध्या गरज आहे. त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृतिशील पावलं उचलायला हवीत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात अजूनही अनेक अडचणी आहेत. विशेषतः नाटकांच्या प्रयोगासाठी त्या अधिक जाणवतात. त्याशिवाय एका प्रयोगासाठी इतर शहरांच्या तुलनेत भाडेही अधिक आहे. याबाबत साकारात्मक कार्यवाही व्हावी, हीच अपेक्षा आहे.

- किरणसिंह चव्हाण, परिवर्तन संस्था

केशवराव’मध्ये एक कोटीच्या निधीतून ही कामे होणार

  • किचन, बैठक व्यवस्थेसह सुसज्ज कॅंटीन

  • खाऊगल्लीच्या बाजूची कमान मूळ स्वरूपात आणणे

  • नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनाचे नूतनीकरण

  • पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक यांच्या पुतळ्याबरोबरच संगीतसूर्य केशवराव भोसलेंचा पुतळाही उभारणार.

  • अंडरग्राउंड वॉटर टॅंक बांधून त्यावर हे सर्व पुतळे उभारण्याचे नियोजन. मात्र, जागा निश्चिती नाही.

  • लाकडी जिने बंदिस्त होणार

  • खासबाग मैदानात प्रवेश करताना पाच बाय पाच मीटर आकाराची दगडी कमान, पैलवानांसाठी आवश्यक सुविधा

  • प्रशासकीय कार्यालयासमोरच ग्रीन रुम्स, व्हीआयपी रूममध्ये आवश्यक सर्व सुविधा.

  • खाऊ गल्लीच्या बाजूच्या

  • संरक्षक भिंतीची डागडुजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com