Sangli : चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेले बिबटे वास्तव्यासाठी वाळवा व शिराळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट

Sangli : चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेले बिबटे वास्तव्यासाठी वाळवा व शिराळा तालुक्यात

इस्लामपूर- चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेल्या बिबट्यांना वाळवा व शिराळा तालुक्यात शिकारीबरोबर वास्तव्यासाठीही योग्य जागा व वातावरण मिळाले आहे. त्यामुळे गेली पाच ते सहा वर्षांपासून दोन्ही तालुक्यांत बिबट्यांची संख्या वाढली आहे. ही वाढती संख्या वाळवा व शिराळा तालुक्यात चिंतेचा विषय बनली आहे

गेल्या दोन वर्षांत बिबट्याने ४९६ पाळीव प्राणी, तर मनुष्यावर सहा हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका हल्ल्यात बालकाचा मृत्यूही झाला आहे. जंगलात दिसणारा बिबट्या हा वन्य प्राणी आता मनुष्य वस्तीमध्ये नियमित वावरणाऱ्या प्राण्यांप्रमाणे दिसू लागला आहे.

वाळवा, शिराळा तालुक्याला कृष्णा व वारणा नदीचे वरदान लाभल्याने प्रत्येकाच्या शेतात सर्वत्र उसाचे पीक उभे आहे. भक्ष्याच्या शोधात चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेल्या बिबट्यांचे आता उसाचे फड अधिवास बनले आहेत. बिबट्याची मादी एका वेळेस दोन ते सहा पिलांना जन्म देते. त्यामुळे त्यांची पैदास झपाट्याने वाढत आहे.

उसाबरोबरच या परिसरात डोंगर व झाडी असल्याने त्यांना लपण्यासाठी भरपूर जागा आहे. ऊस तोडणी करत असताना अनेक ठिकाणी बिबट्याची बछडी आढळून आली आहेत. ही बछडी उसाच्या फडातच लहानाची मोठी होत आहेत.

बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण आहे. तांबवे, नेर्ले, तडवळे, हुबालवाडी या गावांत बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ल्याचा प्रयत्नही केला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ऊसतोड मजुराच्या एका वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला.

तेव्हा बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गेली पंधरा दिवस उरुण-इस्लामपूर हद्दीतील घोल परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन नियमित होत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी आता तर पेठ-सांगली मार्गावर ‘रास्ता रोको’चा वनविभागास इशाराच दिला आहे.

ग्रामपंचायतीत सर्वांना एकत्र बोलावून ग्रामस्थांमध्ये बिबट्याबाबत जनजागृती सुरू आहे. घराभोवती रात्री विजेचे दिवे लावून प्रकाश ठेवावा. आसपास कचरा होता कामा नये. कचऱ्याच्या लालसेने भटकी कुत्री येतात. कुत्र्यांच्या शोधात बिबटे नागरी वस्तीपर्यंत पोहोच आहेत.

- सुरेश चरापले, वनपाल, इस्लामपूर

वशी, लाडेगाव, इटकरे परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. याबाबत वनविभागाने हात न झटकता तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याठिकाणच्या ग्रामस्थांनीही सजग राहणे आवश्यक आहे, अन्यथा जीवितहानी होऊ शकते.

- संपत कांबळे, सरपंच, इटकरे

कुत्र्यांना भक्ष्य करण्यासाठी

कुत्रा हे बिबट्याचे आवडते, सहज मिळणारे भक्ष्य आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर हॉटेलचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचे टाकाऊ अन्न आसपास पडते. ते खाण्यासाठी जमणाऱ्या भटकी कुत्री, डुकरे यांची संख्या वाढली आहे. तेव्हा त्यांना खाण्याच्या आशेने बिबट्या मानवी वस्तीत आढळून येत आहे