
Sangli News : कधीकाळचं शांत, कमी वर्दळीचं सांगली शहर होतं. आता अनेक रस्त्यांवर जीवघेण्या अपघाताचे शहर झाले आहे. आता अपघाताची चर्चा होत नाही. कोण मेलं तरी त्याचं कुणाला दुःख होत नाही. रोज मरे त्याला कोण रडे? अगदी पेठांमधील गर्दीच्या रस्त्यांवरही अपघात होतात; माणसं मरतात. त्याची कारणं, उपाययोजनांवर कोणी बोलत नाही. सर्वपक्षीय पुढाऱ्यांना आता तर निवडणुकांचे-पक्षांतरांचे वेध लागले आहेत. लोकांच्या जगण्या-मरण्याचे कोणाला सोयरसुतकच उरलेले नाही. त्यात महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने हे सारे प्रश्न आमचे नव्हतेच, असे सर्वांनाच वाटते. कितीही लोक मेले, तरी कोणाला काय फरक पडतो?