नुसता गुलाल! सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांचा ढोल-ताशावर ठेका I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

नुसता गुलाल! सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांचा ढोल-ताशावर ठेका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड झाल्याचे कळताच आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आज उधाण आले. ढोल ताशासह संगीताच्या ठेक्यावर अजिंक्यतारा कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी बेधुंद नृत्य केले. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पाटील यांच्याविरोधात माजी आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक अर्ज दाखल करणार होत्या.

तत्पूर्वीच दोघांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि श्री. पाटील बिनविरोध निवडून आले. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. पाटील गटाचे कार्यकर्ते गटा-गटाने अजिंक्यतारा कार्यालयाच्या परिसरातील जमले. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत त्यांनी जल्लोष केला. ढोल ताशासह हिंदी व मराठी गीतांवर त्यांची पावले थिरकली.

हेही वाचा: विधानपरिषद : या दोन जागांसाठी भाजपने सतेज पाटलांसाठी कोल्हापूर सोडलं!

जिल्हाधिकारी कार्यालयातून श्री. पाटील प्रमाणपत्र घेऊन कधी अजिंक्यतारावर पोचतात, याची त्यांना उत्सुकता होती. ग्रामीण भागातील कार्यकर्ते कार्यालयाच्या परिसरात आले होते. त्यांनीही पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. नाद करायचा नाही ढाण्या वाघाचा व ओ शेठ तुम्ही नादच केला थेट, गीतांवर कार्यकर्ते अक्षरशः डोलत होते. हातात मोबाईल घेऊन कार्यकर्ते जल्लोषाचा क्षण रेकॉर्डिंग करण्यात दंग होते. एकमेकांवर गुलालाची ते उधळण करत होते.

loading image
go to top