
'महाविकास'मध्ये फूट; शिवसेनेचा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
कोल्हापूर : जिल्ह्यासह राज्यात सर्व निवडणुका महाविकास (Mahavikas aaghadi sarkar) आघाडीमार्फत एकत्रित लढवण्याची घोषणा जिल्हा आणि राज्य पातळीवरील होत असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (District Bank election 2021) मात्र महाविकास आघाडीतच फूट पडली. समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा करत महाविकासमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही काँग्रेससह (Congress) भाजप (BJP) व मित्र पक्षांनी ही निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. दोन वर्षापुर्वी राज्यात झालेल्या सत्ता बदलात दोन्ही काँग्रेसह शिवसेनेने (Shivsena) एकत्र येऊन सत्ता मिळवली. महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखालीच यापुढच्या सर्व निवडणुका लढण्याचा निर्धार झाला होता; पण त्याला कोल्हापूर जिल्ह्यातच तडा देण्याचे काम झाले. शिवसेनेने सत्तारूढ गटाकडे सुरूवातीला राखीव गटातील नऊपैकी पाच जागांची मागणी केली होती; पण यापैकी तीनच जागा देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दर्शवली होती.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी गेल्या आठवड्यातच बँकेत सेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वतंत्र पॅनेल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाच जागांचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडे देण्याची सूचना खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay mandalik) यांच्याकडे केली होती. याबाबत प्रा. मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर स्वतः प्रा. मंडलिक व महिला प्रतिनिधी गटातील श्रीमती निवेदिता माने (Nivedita mane) यांची अशा दोनच जागा देण्याची तयारी दर्शवली. इतर जागांबाबतची चर्चा दहा तासाहून अधिक काळ बैठक होऊनही फिसकटली.
चार जागा बिनविरोध
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विकास संस्था गटातून आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. या चारही तालुक्यातील अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने प्रत्येक तालुक्यात एकच अर्ज राहिल्याने दोन आमदारांसह चौघांची बिनविरोध निवड झाली.