esakal | देशातील दुसरे फुटबॉल गुरुकुल महाराष्ट्रात... "या' शहरात 19 एकरात साकारणार प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

The Second Football Gurukula In The Country Is In Maharashtra Kolhapur Marathi News

शालेय स्तरावर टॅलेंटेड खेळाडूंना निवडून तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह सोयी-सुविधा देवुन अव्वल दर्जाचे खेळाडू घडवण्याची संकल्पना परदेशात राबविली जाते. दोन वर्षांपूर्वी एआयएफएफने त्याच धरतीवर भारतीय फुटबॉलमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

देशातील दुसरे फुटबॉल गुरुकुल महाराष्ट्रात... "या' शहरात 19 एकरात साकारणार प्रकल्प

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : नैसर्गिक गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी देशातील दुसरे फुटबॉल सेंटर ऑफ एक्‍सलन्स (गुरुकुल) महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्या माध्यमातून नवी मुंबईत हा महत्वकांक्षी प्रकल्प साकारणार आहे. पहिल्या गुरुकुलची उभारणी फुटबॉल पंढरी कोलकत्यात सुरू आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) पुढाकाराने एकोणीस एकर परिसरातील या गुरुकुलात प्रशिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सोयी-सुविधा असणार आहेत. याचा लाभ राज्यातील फूटबॉल खेळाडूंना मिळणार आहे. 

शालेय स्तरावर टॅलेंटेड खेळाडूंना निवडून तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह सोयी-सुविधा देवुन अव्वल दर्जाचे खेळाडू घडवण्याची संकल्पना परदेशात राबविली जाते. दोन वर्षांपूर्वी एआयएफएफने त्याच धरतीवर भारतीय फुटबॉलमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. कोलकत्यात राज्य सरकारच्या मदतीने पहिल्या फुटबॉल गुरुकुलची उभारणी सुरु आहे. राज्य शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय संघटनेतर्फे व्यवस्थापन अशी गुरुकुलची योजना आहे. 

या गुरूकुलात निवासी स्वरूपात विविध वयोगटांतील संघ असणार आहेत. यात खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी चार अद्यावत मैदाने, खेळाडू आणि प्रशिक्षकासाठी आधुनिक निवासस्थाने, जलतरण तलाव असणार आहे. त्याचबरोबर व्यायामशाळा, वैद्यकीय उपचार केंद्र यांचाही समावेश आहे. यात 10000 प्रेक्षक क्षमतेच्या गॅलरीचाही समावेश आहे. 

गेल्याच आठवड्यात एआयएफएफने देशात चांगल्या काम करणाऱ्या राज्य संघटनाचे मानांकन जाहीर केले. त्यात महाराष्ट्राने तुल्यबळ केरळला मागे टाकून बंगाल पाठोपाठ दुसरे स्थान पटकाविले. आता देशातील दुसऱ्या गुरुकुलसाठी मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्राच्या फुटबॉलला अधिक बळ मिळणार आहे. खासकरून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सोयीसुविधांचा लाभ राज्यातील खेळाडूंना होणार आहे. 

विफाचा पुढाकार 
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि उपाध्यक्ष व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरील सर्व निकष पूर्ण केले आहेत. पटेल एआयएफएफचे अध्यक्ष आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) उपाध्यक्ष असल्याने एएफसी आणि जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यातर्फे या गुरूकुलसाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ठाकरे हे राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

loading image