esakal | हातकणंगलेत जनसुराज्यला तीन वर्षात दुसऱ्यांदा संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Second Opportunity For Jansurajya Paksha In Hatkanangale Panchayat Samiti Kolhapur Marathi News

हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती निवडीत चार वर्षांत जनसुराज्य शक्ती पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने जनसुराज्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हातकणंगलेत जनसुराज्यला तीन वर्षात दुसऱ्यांदा संधी

sakal_logo
By
अतुल मंडपे, संजय पाटील

हातकणंगले/वारणानगर : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती निवडीत चार वर्षांत जनसुराज्य शक्ती पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने जनसुराज्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र सभापती निवडीत आवाडेंच्या ताराराणी आघाडीने फारकत घेतल्याने कोरे-महाडिक-आवाडे मनोमिलनाचे काय? याबाबत मात्र चर्चा सुरू आहे. 

आमदार डॉ. विनय कोरे, महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे या तिघांनीही एकत्र येण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. हे तीनही नेते भाजपशी एकनिष्ठ आहेत. 

मात्र हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीत आवाडे प्रणित ताराराणी गट बाजूला गेला. हातकणंगले पंचायत समितीत 22 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे सहा, जनसुराज्यचे पाच, ताराराणी आघाडी पाच, शेतकरी संघटनेचे दोन, शिवसेना दोन, कॉंग्रेस एक व अपक्ष एक असे बलाबल आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी घुणकी पं. स. सदस्या सरीतादेवी हंबीरराव मोहिते यांना संधी मिळाली. तर पारगावच्या सुलोचना देशमुख यांना उपसभापती पदाची संधी प्राप्त झाली. 

ताराराणी आघाडीचे महेश पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा वेळेत राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल केला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेवर जनसुराज्यने दावा केला. भाजपचे अमल महाडिक यांनीही दावा केला, तर ताराराणीच्या महेश पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल केल्यामुळे नाराज असल्याने ते सहभागी झाले नाहीत. एकंदर झालेल्या घडामोडीनंतर हे पद जनसुराज्यकडे गेले. 

गोकुळ, जिल्हा बॅंकसह "राजाराम'चे संदर्भ 
गोकुळ, जिल्हा बॅंक आणि राजाराम कारखान्याच्या निवडणुका लवकरच होत आहेत. यानिमित्ताने गेले काही दिवस राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्‍वभूमीवर हातकणंगले पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक झाली. यात आवाडे गट बाजूला गेला. उर्वरीत भाजप, सेना, जनसुराज्य, संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले. याला गोकुळ, जिल्हा बॅंक आणि राजाराम कारखाना निवडणुकीचे संदर्भ जोडले गेले. याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटतील, असे चित्र आहे. 

यांनी बजावली भुमिका 
पंधरा दिवस सुरू असलेल्या या प्रक्रियेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, अमल महाडीक, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, प्रदिप देशमुख, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा आळतेकर, मनिषा माने आदिंनी भूमिका बजावली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

loading image