
शहरात प्रवास करताना वाहतूक, आजूबाजूची बांधकामे, उभी असलेली वाहने, विक्रेते यांच्यामुळे आपण अनेक ठिकाणी असलेल्या पुलांवरून गेलो हे समजतही नाही. हे पूल शहरांतर्गत दळणवळणाचा मोठा दुवा आहेत; पण त्यांच्यावर उगवलेली झाडे, काँक्रिटचे ढपले पडून उघड्या पडलेल्या व नंतर ऊन-पावसाने सडलेल्या सळ्या, बांधकामाचे संपलेले आयुर्मान ही सारी अवस्था पाहिल्यानंतर महरपालिकेला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही असेच दिसते. पुलांअभावी शहरातील वाहतूक सुरळीत होणार नाही याचे गांभीर्यच नाही. त्याहीपेक्षा या जीर्ण अवस्थेने निर्माण झालेला धोका डोळ्याआड केला जात आहे. शासनाकडे निधी मागणी करून हातावर हात ठेवून चालढकलचा प्रकार सुरू आहे. आता काही कोटीत होऊ शकणारी देखभाल भविष्यात मोठ्या खर्चाचा बोजा बनणार आहे.