esakal | शिरोळमध्ये राजकारणाचे नवे वळण; ज्यांच्याशी संघर्ष, त्यांच्यासाठी मैदानात
sakal

बोलून बातमी शोधा

politics in ahmednagar municipal corporation

शिरोळमध्ये राजकारणाचे नवे वळण; ज्यांच्याशी संघर्ष, त्यांच्यासाठी मैदानात

sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी उभ्या आयुष्यात ज्यांच्याशी संघर्ष केला, किंबहुना या संघर्षातूनच त्यांची चळवळ आणि राजकारण उभारले त्या ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासाठीच जिल्हा बँकेच्या मैदानात त्यांनी घेतलेली उडी चर्चेची ठरली आहे. राजकारणात नेहमीच वेगळे वळण येत असते असे म्हणतात, राजू शेट्टी यांचे राजकारण असे नवे वळण घेत असल्याचे दिसत आहे.

‘दत्त-शिरोळ’ आणि शेट्टी यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर. २०-२२ वर्षांपूर्वी या कारखान्याविरोधातच शेट्टी यांनी पहिले आंदोलन केले. या कारखान्याच्या वार्षिक सभेत श्री. शेट्टी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला; पण यातूनही सुखरूप बाहेर पडलेल्या शेट्टी यांनी मारहाणीमुळे शरीरावर झालेल्या गंभीर जखमांचे भांडवल केले. जखमांसह त्यांचे या परिसरात लावलेले फलक आजही चर्चेत आहेत. या जोरावरच त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकली. येथून सुरू झालेले शेट्टी नावाचे वादळ गेली २० वर्षे शिरोळ आणि जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात कायमच घोंघावत राहिले.

हेही वाचा: जिल्हा बँकेचे राजकारण रंगणार; तीन बडे नेते येणार एकत्र ?

चळवळीतून राजकारणात यश मिळते, हेही शेट्टी यांनी राज्याला दाखवून दिले. जिल्हा परिषद सदस्य असतानाच आमदार आणि आमदारकीचा कार्यकाल शिल्लक असताना सलग दोनवेळा खासदार होण्याची किमया शेट्टी यांनी या राजकारणाच्या जोरावरच केली; पण त्यानंतर घेतलेल्या सोयीच्या राजकारणातूनच त्यांना लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत ते काँग्रेस आघाडीसोबत राहिले तर दुसरी निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर जिंकली; पण दोन्हीही वेळा ते ज्यांच्यासोबत होते त्यांच्यावर टीका करून सत्तेतून बाहेर पडले. आता ‘एकला चलो रे’शिवाय पर्याय नसल्याने त्यांनी पुन्हा स्वतःच्या जोरावरच राजकारणाला सुरुवात केली आहे.

तथापि जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांनी ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मागे राहण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा ठरला आहे. आता पाटील यांना तालुक्यात ताकद देण्याबरोबरच विद्यमान संचालक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सर्वच विरोधकांना एकत्र करण्यात ते यशस्वी झाले. त्यातून ‘स्वाभिमानी’ला रामराम करून बाहेर पडलेले माजी आमदार उल्हास पाटील यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतले आहे. याच पाटील यांनी २०१४ मध्ये श्री. शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या उमेदवाराला पराभवाचा धूळ चारली होती. हे सर्व करत असताना वैचारिक बैठकीपासून शेट्टी दुरावल्याचे आणि त्याचे राजकारण नव्या वळणावर येत असल्याचे दिसते.

हेही वाचा: Chipi Airport: 'नारायण मला तुझा अभिमान आहे असेच बाळासाहेब म्हणाले असते'

लोकसभेला मदत होईल?

आज गणपतराव पाटील यांच्या जिल्हा बँकेतील प्रवेशासाठी शेट्टी मैदानात उतरले आहेत. त्यासाठी तालुक्यातील विरोधकांना एकत्र केले असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत हे सर्वजण शेट्टी यांच्या बाजूने उभे राहतील का, हा खरा प्रश्‍न आहे. पाटील हे तर काँग्रेस विचाराचे; पण पर्याय नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्यमंत्री यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील आणि इतर यड्रावकर विरोधक एकत्र आले तरी लोकसभेला हेच चित्र राहील का नाही याविषयी संभ्रमावस्था आहे.

मग विधानसभेला कोण?

जिल्हा बँकेत राज्यमंत्री यड्रावकर यांना होणाऱ्या विरोधामागे तालुक्यातील विधानसभेचे राजकारण आहे. २०१९ च्या निवडणुकीत श्री. यड्रावकर अपक्ष विजयी झाले आणि मंत्रीही झाले. त्यात उल्हास पाटील यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे सावकर मादनाईक विरोधात होते. विशेष म्हणजे आज शेट्टी यांनी ज्यांच्यासाठी ताकद लावली आहे त्या गणपतराव पाटील यांनी श्री. यड्रावकर यांना पाठिंबा दिला होता. अशा स्थितीत आगामी विधानसभेत श्री. शेट्टी यांची भूमिका काय राहील याविषयीही उत्सुकता आहे.

हेही वाचा: Chipi Airport Live: राणेंच्या विमानातून शिवसैनिकांचा प्रवास

loading image
go to top