esakal | ..म्हणून शिंगटेचा पोलिसांना गुंगारा? 

बोलून बातमी शोधा

 .. so shouting at the police?

गेल्या काही वर्षांपासून तो गोवा बनावटीची दार गडहिंग्लज आणि सीमाभागात चोरट्या मार्गाने आणून विकत होता. त्यामुळे परिसराची त्याला खडा न् खडा माहिती होती. या व्यवसायातून त्याने अनेक तरुणांना जाळ्यात ओढले आहे. त्यामुळेच तो सलग चार दिवस पोलिसांना गुंगारा देत आहे.

..म्हणून शिंगटेचा पोलिसांना गुंगारा? 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : येथील न्यायालयातून पलायन केलेला मोक्कातील आरोपी श्रीधर अर्जुन शिंगटे याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. श्रीधर शिंगटे गेली काही वर्षे गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात होता. त्याचा गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्‍यांसह कोकण आणि कर्नाटक सीमाभागात नेहमी वावर असायचा. या अवैध व्यवसायामुळे परिसरासह छुप्या रस्त्यांची पक्की माहिती असल्याने शिंगटे पोलिसांना गुंगारा देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गोवा बनावटीच्या दारूची गडहिंग्लज उपविभाग व कर्नाटक सीमाभागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दोन्ही राज्यातील दारूच्या किमतीत असणाऱ्या फरकामुळे ही दारू गोव्यातून अवैधरीत्या आणली जाते. या व्यवसायात श्रीधर शिंगटेचा हातखंडा होता. गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो या व्यवसायात कार्यरत आहे. गोव्यातून "बल्क'ने अवैधरीत्या दारू आणून स्थानिक पातळीवर विक्री करणाऱ्यांना पुरविण्याचे काम शिंगटे करीत होता. गडहिंग्लज उपविभाग, भुदरगड तालुक्‍यासह कर्नाटक सीमाभागात त्याचे मोठे नेटवर्क आहे. याप्रकरणी शिंगटेवर गुन्हेही दाखल आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये त्याला अटकही झाली होती.

दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्याचे काम रात्रीच चालत असे. या अवैध व्यवसायामुळे शिंगटेला गडहिंग्लज उपविभागासह कोकण आणि कर्नाटक सीमाभागाची पक्की माहिती आहे. या परिसरातील छोटी-छोटी गावे, त्या ठिकाणी जाण्याच्या रस्त्यांची कल्पना आहे. व्यवसायच अवैध असल्याने अगदी छुप्या रस्त्यांची, पोलिसांची गस्त असणाऱ्या रस्त्यांचीही त्याला माहिती आहे. शिंगटेने न्यायालयातून पलायन केल्यानंतर तीन दिवस उलटले आहेत. पहिल्या दिवशी तर तो गडहिंग्लज तालुक्‍यातच असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी परिसराची असणारी पक्की माहितीच शिंगटेच्या पथ्यावर पडत आहे की काय, असे म्हणण्यास वाव राहत आहे. 

श्रीधर शिंगटे यापूर्वी लपून-छपूनच काम करीत होता. पलायन केल्यामुळे आता तो अधिक लपून राहत आहे; पण आम्ही त्याच्या मागावर आहोत. शिंगटेला पकडण्यात लवकरच यश येईल. 
- तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग