12 सुवर्णपदके मिळूनही संघर्ष सुटेना; उमेश,शोभा वंचितच lKolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shobha,Umesh Patil

12 सुवर्णपदके मिळूनही संघर्ष सुटेना; उमेश,शोभा वंचितच

कोल्हापूर : आम्ही जरी अपंग असलो तरीही नोकरीसाठी दारोदारी फिरलो; पण अपंग आहे म्हणून अनेकांनी नोकरी नाकारली. तब्बल १२ सुवर्णपदके (Gold medal) मिळालेले अपंग शोभा व उमेश पाटील (Shobha,Umesh) सांगत असतात आणि त्यांची संघर्षाची कहाणी उलगडत जाते. अजूनही ते नोकरीच्या अधिकारापासून वंचितच आहेत. सोनतळी (ता. करवीर) (Sontali)येथील हे दाम्पत्य आहे.

सोनतळी येथे शाहूकालीन घोड्याच्या पागा आहेत. पूर्वी उमेश पाटील यांचे चुलते येथे कामाला होते आणि त्यामुळे त्यांना तिथे राहण्याची मुभा होती. उमेशचे वडील व त्यांचे चुलते पूर्वी एकत्र राहत होते; परंतु त्यानंतर त्यांना इतरत्र भाड्याच्या खोलीत राहावे लागले. पाटील यांना पोलिओमुळे एका पायाला अपंगत्व आले. त्यामुळे उमेशच्या वडिलांना धक्का बसला. त्यांचे कसंबसं शिक्षण झालं आणि शिक्षण घेता घेता पुण्यात नोकरीही मिळाली; परंतु ती फार काळ टिकली नाही.

हेही वाचा: 'निवडणुकीत शिवसेना खासदारांच्या आई भाजपसोबत, किंमत मोजावी लागेल'

त्या ठिकाणी शोभा भेटल्या; परंतु शोभा यांना चुकीच्या पोलिओ डोसमुळे दोन्ही पायांना अपंगत्व आलेले. हे असं असतानाही पाटील यांनी शोभा यांच्याशी विवाह केला. शोभा यांना दिव्यांगांच्या स्पर्धेत तब्बल बारा गोल्ड मेडल मिळाली आहेत. त्यामुळे त्या दोघांनी नोकरीसाठी अनेक दारं झिजवली; परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. अपंग असणं हे पाप आहे का? हे त्यांना सारखं सारखं सतावतं. वडील रिक्षा, आई घरकाम, उमेश भाजी विक्री असं काही ना काही करत घर चालत होतं; परंतु आई-वडील आणि उमेश यांना कोरोनाने घेरलं. तिघेही सीपीआरमध्ये अ‍ॅडमिट झाले.

हेही वाचा: KDCC Bank Election: ठाकरेंच्या जीवावर कोल्हापुरात काँग्रेसची चैनी

उपचारा दरम्यान वडिलांचे निधन झाले. त्याची माहिती २० दिवसांनी उमेश आणि त्यांच्या आईला समजली. दोघांनाही मोठा धक्का बसला. त्यातच घराच्या खिडक्यांना दारं नसल्यामुळे प्रापंचिक साहित्यावर चोरांनी डल्ला मारला. त्यामुळे त्यांचे आणखीनच खच्चीकरण झाले. ते आजही या छप्परातच राहतात. त्यांच्या संसारवेलीवर दिशा व दर्शन ही फुलेही उमलली आहेत. त्यांचे भविष्यही त्यांना घडवायचे आहे; मात्र अडचणींचा डोंगर अजून तरी न संपणारा आहे.

टॅग्स :SonpethKolhapur