special article for village festival of shimoga transitions in panhala kolhapur
special article for village festival of shimoga transitions in panhala kolhapur

कोल्हापुरात गावखेड्यांनी जपलीय गुंडी उचलण्याची परंपरा, वाचा सविस्तर

Published on

कोल्हापूर : आज हुताशनी पौर्णिमा म्हणजेच शिमगा. या दिवशी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, विविध परंपरांनी हा सण साजरा केला जातो. यातीलच एक प्रकार म्हणजे गावगाड्यातील गुंड उचलण्याची पद्धत. आजच्या दिवशी अनेक गावात ही परंपरा जपच शिमगा साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या मंदिराच्या समोरील गुंड उचलण्याची परंपरा कोल्हापुरातील अनेक भागात आजही मोठ्या उत्साहाने साजरी होताना पाहायला मिळते. गावातील वरिष्ठ, ज्येष्ठ मंडळींपासून ते अगदी तरुण पिढीही या परंपरेत मोठ्या आनंदाने सहभागी होते. 

ग्रामीण भागातील गावच्या रूढी, परंपरा, चालीरीती म्हणजे गावगाडा. अशाच गावगाड्यातील गोष्ट म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिरा समोरील गुंड उचलणे. गावातील मंदिराच्या एका कोपऱ्यात सुमारे शंभर ते दीडशे किलो वजनाचा एक गोलाकार दगड असतो. तो दगड म्हणजेच गुंड. तो उचलण्याची परंपरा आजही काही गावात सुरू आहे. हा गुंड उचलण्यापाठी अनेक आख्यायिका असल्याचे बोलले जाते. या गोष्टीचे शास्त्रीय कारण, देव, नवस, पैज, श्रद्धा या साऱ्याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर ती गोष्ट म्हणजे हा गुंड उचलणाऱ्याच कसब. युक्ती आणि शक्तीची सांगड घालून दाखवलेले कौशल्य.

कोतोली, गुडे, वाघवे या पन्हाळा तालुक्यातील गावात आजही परंपरा कायम आहे. ग्रामदैवताच्या मंदिरांसमोर सुमारे सव्वाशे किलोचे गुंड आहे. गावची यात्रा व गौरी गणपती विसर्जन या दोन दिवशी गावात गुंड उचलण्याची परंपरा असते. गावातील पैलवान, धष्टपुष्ट मंडळी गुंड उचलण्याचे धाडस करतात. ती गुंड उचलताना खूप दमछाक होते. जेवढी उचलुन घ्यायचा प्रयत्न कराल तेवढी ती निष्ठुनही जाते. चुकीच्या पद्धतीने उचलली तर इजाही होण्याची शक्यता असते. फक्त ताकद न वापरता याला युक्तीचीही जोड द्यावी लागते. जमिनीपासून ते एका विशिष्ट लयीत अलगद उचलावी लागते. पूर्ण एकाग्रतेने खांद्यावरती घेऊन ग्रामदैवताच्या मंदिराभोवती वेढा काढावा लागतो. ही परंपरा आजही या गावांनी जपली आहे. 

गावातील अनेकजण आजही ही गुंड उचलत आहेत. जुन्या पिढीतील विष्णू लव्हाटे, तानाजी पाटील, पांडुरंग मस्कर, अनिल चौगुले, बाबासो पाटील यांच्यापासून ते आत्ताच्या पिढीतील सुभाष मगदूम, रवींद्र सावंत, महेश पाटील हे तरुण आजही हे गुंड अगदी श्रद्धेने उचलतात. गावच्या यात्रेत हे गुंड उचलून पाठीवर शाबासकीची थाप मिळते. यावेळी गुंड उचलणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे मानधन, बक्षीस किंवा रक्कम दिली जात नाही. पण बघणाऱ्यांपैकी एखाद्या हौशी गावकऱ्यांकडून बांधला जाणारा मानाचा फेटा आणि दिला जाणारा मानाचा नारळ याची किंमत मात्र लाखो रुपयांतही मोजता येत नाही.

डोक्यावर जेव्हा तो फेटा चढतो, तेव्हा मुठभर मांस अंगावर चढत असे सर्व सांगतात. पण आज गावोगावी बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गावच्या तालमीची जागा आता जीमने घेतली आहे. पण आजही काही तरुण गावच्या लाल मातीतच कसून सराव करत आहेत. आज काही परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, पण या गावांनी गावगाड्यातील ही परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. आपल्या ताकतीचं, कौशल्याचं, प्रदर्शन करण्याच हे एक हक्काचं व्यासपीठ म्हणून टिकलं पाहिजे. येणा-या पिढीला देखील गावगाड्यातील या परंपरेची माहिती असायला हवी. ही परंपरा अविरतपणे चालू राहायला हवी. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com