esakal | World Book Day - 'स्टोरीटेल', 'ई-बुक्‍स'ना वाढणार मागणी

बोलून बातमी शोधा

World Book Day - 'स्टोरीटेल', 'ई-बुक्‍स'ना वाढणार मागणी
World Book Day - 'स्टोरीटेल', 'ई-बुक्‍स'ना वाढणार मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संचारबंदी आता अधिक कडक होत असताना 'स्टोरीटेल' आणि 'ई-बुक्‍स'ना पुन्हा मागणी वाढणार आहे. नव्या पिढीचा या माध्यमांकडे अधिक कल असून गोष्टी वाचण्याबरोबरच ऐकण्यावर भर दिला जाणार आहे. २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्‍सपिअरचा जन्म आणि मृत्यूदिनही. यानिमित्ताने जगभर वाचन संस्कृतीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम फारशे होणार नसले तरी ऑनलाईन माध्यमातून वाचनसंस्कृतीवर जरूर चर्चा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर 'स्टोरीटेल' आणि 'ईबुक्‍स'ना मागणी वाढणार असली तरी ती तत्कालीक असेल, अशा प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या.

संचारबंदीमुळे सर्व पुस्तकालये, ग्रंथदालने बंदच आहेत. त्यामुळे ऑनलाईन पुस्तके कुणी मागवली तरी त्यांना ती पाठवणे शक्‍य होणार नाही. विविध ॲप्स आली असली तरी प्रत्यक्ष पुस्तके वाचण्याचा अनुभव वेगळाच असतो. त्याशिवाय मोबाईल, टॅबवर पुस्तके ऐकणे किंवा वाचल्यामुळे डोळ्यांचे विकारही वाढतात. या पार्श्‍वभूमीवर मुद्रित पुस्तकांची मागणी संचारबंदीनंतर पुन्हा नक्की वाढणार आहे.

हेही वाचा: जिल्हाबंदी लागू, रस्ते सील; कोल्हापुरकर विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही

पुस्तके देतात प्रेरणा अन्‌ जीवनाला आकारही...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी 'पुस्तके प्रेरणा देतात. जीवनाला आकार देतात..' असे आवर्जुन सांगितले.

"चौफेर वाचनावर पहिल्यापासूनच भर दिला आहे. प्रत्येक पुस्तकातून मी काही ना काही शिकतो. एखादे विशिष्ट पुस्तक टर्निंग पॉईंट ठरले, असे सांगता येणार नाही. 'वपुर्झा' असेल 'सत्याचे प्रयोग' असतील किंबहुना सानेगुरुजी, रघुनाथ माशेलकर, सुधा मूर्ती, नंदन नीलकेणी अशा अनेक दिग्गजांची पुस्तके आजवर वाचली आहेत. प्रत्येक पुस्तकातून नक्कीच नवी दिशा मिळते."

- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

हेही वाचा: जिल्ह्यातील कारखाने, उद्योगांचा ऑक्‍सिजन रुग्णांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

"महिन्याला दोन नवीन पुस्तके वाचतो. अनुभव कथित करणारी व थोरांच्या अनुभवावर आधारित पुस्तकातून प्रेरणा मिळते. पुस्तक हेच गुरू आहेत. वाचनातून विचार क्षमता, कल्पकता वाढून तुम्ही प्रगल्भ, अनुभव संपन्न होता. त्याचा उपयोग आयुष्यभर होतो. 'महानायक', 'पानिपत', 'श्रीमानयोगी' ही भावलेली पुस्तके आहेत."

- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

"शिवाजीराव सावंत यांचे 'मृत्युंजय' हे माझे सर्वाधिक आवडते पुस्तक आहे. आमच्या पिढीला पुस्तकांनी अधिक समृद्ध केले. नव्या पिढीनेही पुस्तकांची कास धरावी. अलीकडच्या काळात 'स्टोरीटेल', 'ई-बुक्‍स'चा ट्रेंड आहे. मात्र, जगणं अधिक समृद्ध करणारी पुस्तकं आपल्या संग्रही असावीत. कधीही आणि कुठेही, कुठल्याही परिस्थितीत ती नक्कीच मार्गदर्शक ठरतात."

- अजयकुमार माने, प्रभारी, मुख्य कार्यकारी अधिकारी