esakal | सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत सातव्यांदा बदलला निर्णय; 31 ऑगस्टपर्यंत पुन्हा स्थगिती! "गोकुळ' च्या निवडणूक प्रक्रियेविषयी घ्या जाणून

बोलून बातमी शोधा

state government announced a decision to postpone the election of cooperative societies political marathi news

इतर निवडणुका पाच महिने लांबणीवर ः 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती, तब्बल सातव्यांदा निर्णय 

सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत सातव्यांदा बदलला निर्णय; 31 ऑगस्टपर्यंत पुन्हा स्थगिती! "गोकुळ' च्या निवडणूक प्रक्रियेविषयी घ्या जाणून
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका तब्बल पाच महिने पुढे ढकलण्याचा निर्णय आज राज्य शासनाने जाहीर केला. तब्बल सातव्यांदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या निवडणुकांना 31 ऑगष्ट 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुकांना यातून वगळल्याने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया सुरूच रहाणार आहे. सद्या "गोकुळ' ची छाननी पूर्ण झाली असून 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. 

हेही  वाचा-व्यवसाय चालू ठेवायचे का नाही? कोल्हापुरात फेरीवाले कृती समितीने घेतली ही भूमिका

राज्यात गेल्यावर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरूवातीला 18 मार्च 2020 रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 जून 2020 पर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर वेळोवेळी यात वाढ करत आतापर्यंत तब्बल सहा वेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 24 फेब्रुवारी 2021 रोजी या संदर्भातील शेवटचा आदेश काढून 31 मार्च 2021 पर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपून सहा दिवस झाल्यानंतर आज राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी या निवडणुकांना 31 ऑगस्टपर्यंत 2021 पर्यंत स्थगिती दिल्याचे आदेश काढले. ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहे, त्या टप्प्यावर या प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आली आहे. या आदेशातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाने प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. 

"गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच 
"गोकुळ' च्या निवडणुकीबाबत 10 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने आदेश देताना ही प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी पुन्हा सर्वच निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने काढले. त्यानुसार जिल्हा बॅंकेचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 24 फेब्रुवारी 2021 रोजी पुन्हा या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. पण 10 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार "गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच राहीली. आज काढलेल्या आदेशातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांना वगळल्याने "गोकुळ' ची उर्वरित प्रक्रिया सुरूच रहाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. 
 
आतापर्यंत सातवेळा स्थगिती 
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आतापर्यंत सातवेळा स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील पहिला आदेश 18 मार्च 2020 रोजी काढण्यात आला. त्यानंतर 17 जून 2020, 28 सप्टेंबर 2020, 31 डिसेंबर 2020, 16 जानेवारी 2021 व 24 फेब्रुवारी 2021 या तारखांना स्थगिती देण्यात आली. आता सातव्यांदा आज 31ऑगस्टपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. 

संपादन- अर्चना बनगे