esakal | माणुसकीचं दर्शन! तब्बल शेकडो बेवारस मृतदेहांवर सुप्रियाकडून अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकीचं दर्शन! तब्बल शेकडो बेवारस मृतदेहांवर सुप्रियाकडून अंत्यसंस्कार

माणुसकीचं दर्शन! तब्बल शेकडो बेवारस मृतदेहांवर सुप्रियाकडून अंत्यसंस्कार

sakal_logo
By
- मतीन शेख

कोल्हापूर : मूळच्या पुण्याच्या (Pune)असलेल्या २७ वर्षीय सुप्रिया देशपांडे ९ वर्षांपूर्वी कोल्हापूरला (Kolhapur) आल्या. वडिलांची बदली येथे झाल्याने त्या मंगळवार पेठेत राहू लागल्या. अनाथांना मदतीचा हात देणाऱ्या व बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या मानवसेवा, सेकंड इनिंग होम्स या सेवाभावी संस्थेत त्यांनी नोकरी स्वीकारली. सुरवातीला ऑफिसचे काम पाहणाऱ्या सुप्रिया यांनी संस्थेचे किशोर नैनवाणी यांच्या प्रेरणेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम सुरू केले. चार वर्षांपासून त्यांनी शेकडो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले आहे.(success-story-supriya-deshpande-funeral-on-corpses-kolhapur-marathi-news)

अगदी धाडसाने पुढे होऊन सुप्रिया हे कार्य करत आहे. मृतदेह सडलेला, कुजलेला, तर अन्य कसाही असला तरी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तो व्यवस्थित बांधून पोलिसांच्या मदतीने प्रथम सीपीआरमध्ये आणला जातो. तेथील शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवस नातेवाइकांची वाट पाहिली जाते. ते न आल्यास मृतदेह या संस्थेच्या ताब्यात दिला जातो. त्यानंतर त्याच्यावर रीतसर अंत्यसंस्कार केले जातात, अशी संस्थेची कार्यशैली आहे. या कामात सुप्रिया कायम आघाडीवर असतात.

हेही वाचा- जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक; अभिजीतचा थक्क करणार प्रवास

मानवसेवा संस्थेचे कार्य त्यांना भावले आणि त्यांनी या कार्यात झोकून दिले. कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी न चुकता ही सेवा बजावली आहे. त्यांनी आतापर्यंत घटनास्थळी जाऊन जवळजवळ २० ते २५ मृतदेह बांधून देण्यास मदत केली आहे. त्याचबरोबर ८०० वर बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्नेहल काकते व मनीषा गायकवाड याही सुप्रिया यांच्यासोबत हे कार्य करत आहेत. यातून माणुसकीचा वेगळा धर्म त्या जपत आहेत.

हवे मदतीचे बळ

मानवसेवा संस्थेच्या माध्यमातून वर्षाला शेकडो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यासाठी कापड, फुले, कापूरसह इतर अंत्यसंस्काराचे साहित्य आवश्यक असते. यासाठी मारुती मंदिर ट्रस्टकडून काही मदत दिली जाते; परंतु संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर नैनवाणी यांनी केले.

या संस्थेच्या माध्यमातून मी मानवतेची सेवा करत आहे. सेवेचे यापेक्षा मोठे व्यासपीठ कोणतेच नाही. पुढे ही सेवा मी कायम ठेवेन.

- सुप्रिया देशपांडे

loading image