
कोल्हापूर : परजिल्ह्यातील संघांना स्थानिक स्पर्धांत प्रवेश द्यावा
कोल्हापूर : केएसए जिल्हा फुटबॉल संघातून खेळणाऱ्या खेळाडूंचा परफॉर्मन्स उत्कृष्ट आहे. परजिल्ह्यातील स्पर्धांत अजिंक्यपद मिळविण्याचा करिष्मा त्यांनी दाखवला आहे. स्थानिक प्रत्येक संघात तीन-चार खेळाडू हमखास उत्कृष्ट खेळ करणारे नक्की आहेत. मात्र, शहरातील असे किती संघ आहेत, जे परजिल्ह्यातील स्पर्धात खेळतात, हे तपासून पाहावे लागेल. त्याचबरोबर स्थानिक स्पर्धांत परजिल्ह्यातील किती संघांना प्रवेश दिला जातो, याकडेही लक्ष द्यावे लागेल.
केएसए संलग्नित ‘अ’ गटात १६ व ‘ब’ गटात तितकेच संघ आहेत. त्यातील फार थोडे संघ परजिल्ह्यातील स्पर्धात जाऊन खेळणारे आहेत. खेळाडूंच्या परफॉरमन्समध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्यांनी बाहेरील स्पर्धात जाऊन सामने खेळणे गरजेचे आहे. त्यातून त्यांचा अनुभव वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, असे घडत नाही. प्रवास, खेळाडूंचा नाश्ता व जेवणाच्या खर्चाचे गणित पेलणे संघ व्यवस्थापनाला तितके सोपे नसते. केवळ छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळणे, यावरच संघ लक्ष केंद्रित करतात.
हेही वाचा: CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत
विशेष म्हणजे स्थानिक संघातील खेळाडूंची संतोष ट्रॉफीसारख्या स्पर्धेसाठी निवड होऊ शकत नाही, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. त्यामागे नक्की नेमके कोणती कारणे आहेत, याचा उलगडा करायचा ठरवला तर कोण कमी पडते, यावर प्रकाशझोत टाकावा लागेल.
संयोजकांना तयारी दाखवावी लागेल
स्थानिक स्पर्धांत परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील किती संघांना प्रवेश दिला जातो, हेही महत्त्वाचे आहे. त्या संघाविरुद्ध स्थानिक संघांचे सामने झाल्यास त्यांचा खेळ पाहता तर येईलच. शिवाय स्थानिक संघांना परफॉरमन्समध्ये कोठे बदल करावा, लागेल हे समजून येईल. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत किमान बाहेरील चार संघांना सामावून घेण्याची तयारी संयोजकांना दाखवावी लागेल. तसा सूरही फुटबॉलप्रेमींत आहे. त्याला केएसए नियमाचे बंधन लावणार का, हाच प्रश्न आहे.
Web Title: Teams District Should Be Allowed To Participate In Local Competitions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..