esakal | अस्तित्व राखण्याचे कॉँग्रेसपुढे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

vishwajit kadam

अस्तित्व राखण्याचे कॉँग्रेसपुढे आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिराळा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. येथे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी काँग्रेसपुढे कडवे आव्हान आहे. ते पेलण्याची ताकद ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्यानंतर मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी द्यावी, असा आग्रह नेते, पदाधिकाऱ्यांनी धरला आहे.

तालुक्यात काँग्रेस मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला. अनेक वर्षे काँग्रेसचा प्रभाव होता. नाईक व देशमुख गटात संघर्ष असे. सन १९९५ मध्ये शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक या गुरू शिष्यात दुरावा निर्माण झाला. कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली. फत्तेसिंगराव नाईक (आप्पा), शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक असे तीन गट निर्माण झाले.

त्यावेळपासून इथले राजकारण तीन घराण्यांभोवती फिरू लागले. सोयीनुसार यातील दोन गट एकत्र येऊन लढू व जिंकू लागले. सन २०१९ मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून सत्यजित देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. कॉंग्रेसला हा धक्काच होता. जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी सागावचे माजी आमदार भगवानराव पाटील यांचे चिरंजिव ॲड. रवी पाटील यांना तालुकाध्यक्ष करून काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे दिली. त्यांनी सोबती घेऊन नव्याने संघटना बांधणीवर भर दिला. पण त्यांची वैयक्तिक ताकद कमी पडते आहे.

जिल्हा काँग्रेसची भिस्त आता मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यावर आहे. त्यांनी शिराळ्यात कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव मिळविण्यासाठी सहकार्य करावे, असा आग्रह कार्यकत्यांनी त्यांच्याकडे येथील बैठकीत धरला. वेगवेगळ्या शासकीय समितीवर कार्यकर्त्यांना संधी द्या. लोकांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करा, अशी मागणी केली. लोकांच्या अडचणी सोडवल्या तरच लोक पाठीशी राहून काँग्रेसचे संघटन मजबूत होण्यासाठी मदत होईल. उत्तर भागात असणाऱ्या वाकुर्डे योजनेच्या पाण्यापासून वंचित गावांसाठी लढा उभारण्याची गरज आहे. हा प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून हाताळून न्याय देऊया, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा: सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शिराळा तालुक्यावर बारीक लक्ष ठेवणे माझी नैतिक जबाबदारी आहे. आम्ही तुमच्या पाठीशी सर्व ताकद उभी करून या तालुक्यातील काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ

- डॉ. विश्वजित कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री

तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय समितीवर कार्यकर्त्यांना संधी देऊन तालुक्यातील जिव्हाळ्याच्या असणाऱ्या चांदोली व वाकुर्डे योजनेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे आहे.

-ॲड. रवि पाटील, तालुकाध्यक्ष

loading image
go to top