कोल्‍हापुरात स्पोर्टस् सायन्स सेंटर व्हावे | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्‍हापुरात स्पोर्टस् सायन्स सेंटर व्हावे

कोल्‍हापुरात स्पोर्टस् सायन्स सेंटर व्हावे

कोल्हापूर : प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये स्पोर्टस् सायन्स सेंटर व्हावे. यामुळे क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचे नाव आणखी उदयास येईल, असा विश्वास राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बखोरिया यांनी व्यक्त केला. श्री. बखोरिया यांनी विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम तसेच नियोजित जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

श्री. बखोरिया म्हणाले, ‘‘काही वर्षांत कोल्हापूरचे क्रीडा क्षेत्र प्रगतिपथावर आहे. कोरोनाच्या कालावधीतही येथील खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव करून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह ऑलिम्पिकमध्ये चमक दाखवली आहे. असे असताना खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा अपूर्ण आहेत. हे चित्र बदलण्यासाठी क्रीडा विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच दृष्टीने जिल्ह्यासाठी सुसज्ज अद्ययावत सुविधायुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र संकुलाचा प्रस्ताव ठेवला आहे. हे क्रीडा संकुल उभारणीसाठी शेंडापार्क परिसरातील जागा प्रस्तावित आहे.’’

हेही वाचा: जागतिक मधुमेह दिन : मधुमेहाचा फास भारता भोवती वाढत आहे.

या ठिकाणीही बखोरिया यांनी भेट दिली. यानंतर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे भेट देऊन तेथील कामाची माहिती घेतली. येथून छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे भेट दिली. संकुलाच्या निर्मितीपासून जलतरण तलावाच्या समस्येबाबत माहिती घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना केल्या तसेच शूटिंग रेंज येथे डिजिटल टार्गेट लवकर बसवावेत, असे सांगितले. या वेळी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे उपस्थित होते.

खेळाडूंच्या विविध समस्यांचा अभ्यास

स्पोर्टस् सायन्स सेंटर हे खेळ आणि मानवी शरीरावर अभ्यास करणारे अद्ययावत असे केंद्र आहे. वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंच्या शरीरावर आणि मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. सेंटरमध्ये अत्याधुनिक क्रीडा साहित्यासह डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, वर्कआऊट युनिट, हायड्रोथेरपिस्ट, स्पोर्टस् सायकॉलॉजी विभाग, स्पोर्टस् न्यूट्रिशनिस्ट असतात.

loading image
go to top