esakal | दोन दिवसांत  मुंबई, पुण्याची   जिल्ह्यात हजारो वाहने 

बोलून बातमी शोधा

Thousands of vehicles in Mumbai, Pune district in two days

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबई, पुण्यात घातलेल्या निर्बंधामुळे त्या ठिकाणी काम करणारे कोल्हापूरसह जिल्ह्यातील चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली आहे.

दोन दिवसांत  मुंबई, पुण्याची   जिल्ह्यात हजारो वाहने 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबई, पुण्यात घातलेल्या निर्बंधामुळे त्या ठिकाणी काम करणारे कोल्हापूरसह जिल्ह्यातील चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली आहे. शुक्रवारची सुटी आणि त्यानंतर सलग सुटीचा फायदा घेत दोन दिवसांत हजारो वाहने कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत. 


राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. मुंबई, पुण्यासह नागपूर व राज्यातील अन्य राज्यांत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत तर एका दिवसात तब्बल 11 हजार रुग्ण सापडले, पुणे जिल्ह्यातही दहा हजार रुग्ण एकाच दिवशी सापडले. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही या दोन जिल्ह्यांत जास्त आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध, तर पुण्यात सायंकाळी सहा नंतर संचारबंदी जाहीर केली आहे. त्यातच काल (ता. 4) राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. त्यात दर शनिवार, रविवार पूर्ण संचारबंदी जाहीर केल्याने पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या जिल्ह्यातील लोकांनी स्वगृही परतणे पसंत केले आहे. दोन दिवसांत असंख्य वाहने कोल्हापुरात दाखल झाली. मुंबई, पुणेसह अन्य जिल्ह्याचे पासिंग असलेल्या या वाहनांत साहित्यांसह लोक परतताना दिसत होते. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी तालुक्‍यातील अनेक चाकरमानी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुण्यात स्थायिक झाले आहेत. ते राहात असलेल्या ठिकाणीच कोरोनाचा कहर वाढल्याने या चाकरमान्यांनी आपल्या घरची वाट धरली आहे. भविष्यात आणखी कडक निर्बंध लागले, तर आहे त्याच ठिकाणी अडकून पडण्याच्या भीतीने हे लोक आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र आहे. 


तपासणी न करताच प्रवेश 
गेल्यावर्षीही मार्चमध्ये हीच परिस्थिती होती. त्यावेळी कोरोनाचे रेड झोन असलेल्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची चाचणी सक्तीची केली होती. यावेळी मात्र येणाऱ्या वाहनांचीच नव्हे, तर व्यक्तींची साधी नोंदही प्रशासनाने घेतलेली नाही. कोरोनाबाधित शहरातून येणाऱ्या या लोकांकडून संक्रमण झाल्यास जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे; पण येणाऱ्या लोकांची तपासणीही होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.