
श्वास गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू ; दत्त शेतकरी साखर कारखान्यातील घटना
शिरोळ (कोल्हापूर) : येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या टाकीमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा काल श्वास गुदमरून मृत्यू झाला. गोपाळ सिद्राम जंगम (वय 43, रा. औरवाड), संदीप रमेश कांबळे (38, रा. कुटवाड) व राजेश यशवंत ठोमके (46, रा. उदगाव, सर्व ता. शिरोळ) अशी मृतांची नावे आहेत. कारखान्याच्या ईटीपी प्लॉंटजवळील अनअरोबिक टॅंकमध्ये सांडपाण्याची पाईप तुंबली आहे का, हे पाहण्यासाठी तिघेही कामगार टाकीत उतरले होते.
येथील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ईटीपी प्लॉंट आहे. प्रकल्पात कारखाना सुरू असताना सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. ते पाणी शेतीसाठी तसेच कंपोस्ट खतासाठी वापरले जाते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर ईटीपी प्लॅंटमधील वेगवेगळया टॅंकची दुरुस्ती केली जाते. प्लॅंटजवळ अनअरोबिक टॅंक आहे. तो सुमारे वीस फूट लांब व दहा फूट खोलीचा आहे. टॅंकच्या बाजूस जाड पत्र्याचे आवरण आहे. टॅंकमध्ये उतरण्यासाठी तीन फूट रुंदीचे झाकण आहे. जंगम, कांबळे व ठोमके टॅंकमधील पाईप तुंबली आहे का, हे पाहण्यासाठी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास झाकण उघडून शिडीच्या सहायाने तिघांपैकी, एक जण टॅंकमध्ये उतरला. तथापि त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याने आरडाओरड केली. त्याला बाहेर काढण्यासाठी अन्य दोन्ही कामगार टॅंकमध्ये उतरले. मात्र, त्यांचाही श्वास गुदमरल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत.
दरम्यान, टॅंकमधील कामगारांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अन्य कामगार घटनास्थळी आले. काहींनी ही माहिती वरिष्ठांना दिली. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेसीबीच्या सहायाने टॅंक एका बाजूने फोडण्यात आला. आवरणाचा जाड पत्रा काढला. कामगार राजू रजपूत व प्रमोद देशिंगे यांनी तिघांना बाहेर काढले. यावेळी रजपूत यांनाही भोवळ आली.
हेही वाचा- अडचणीत आहात? "गोल्ड लोन' हुकमी पर्याय
तिघांना कारखाना कार्यस्थळावरील आरोग्य केंद्रात दाखल केले. तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत कारखान्यातील सर्व कामगारांनी आरोग्य केंद्राजवळ धाव घेतली. तिघांचे नातेवाईकही केंद्राजवळ धावून आले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शक्तिजीत गुरव यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात वर्दी दिली.
कारखान्याच्या इतिहासातील दुसरी दुर्घटना
सन 1994 मध्ये कारखान्याचा बॉयलर फुटून झालेल्या दुर्घटनेत पाच कामगार जागीच ठार झाले होते. काही कामगार किरकोळ जखमी झाले होते.
घटना दुर्दैवी आहे. मृत कामगारांच्या नातेवाईकांना नियमानुसार मिळणारी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. कामगारांच्या घरातील कोणाही एका व्यक्तीस नोकरी दिली जाईल. कुटुंबीयांना सर्व ती मदत केली जाणार आहे.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त साखर कारखाना शिरोळ
Edited By- Archana Banage
Web Title: Three Workers Die Of Suffocation Incidence On Datta Sugar Factory
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..