वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान

वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान

फोटो - संग्रहित

वस्त्रनगरीतील गुन्हेगारी - १
-----
व्यापारदृष्ट्या महत्त्वाच्या शहरापैकी एक असलेल्या इचलकरंजी परिसरात काही महिन्यांपासून क्राईम रेट वाढला आहे. खूनी हल्ले, चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या यासोबतच मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दुचाकीच्या चोऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असुन पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला नसल्याचे दिसत आहे. अवैध व्यवसाय फोफावत असून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे. ही परिस्थिती पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणारी आहे. याच वस्त्रनगरीतील गुन्हेगारीवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...
------------
वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान
क्षुल्लक कारणाचे परिणाम गंभीर घटनांमध्ये; शोधाचे प्रमाण नगण्य
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.१३ : शहरात वाढत्या शहरीकरणाबरोबरच लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. गुन्हेगारी टोळ्या, गँग वॉर, खुनासारखे गंभीर गुन्हे कमी होत असले तरी चेन स्नॅचिंग, दुचाकी व जबरी चोऱ्या, घरफोडी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मात्र लक्षणीय वाढ होत आहे. या तुलनेत या गुन्ह्यांच्या शोधाचे प्रमाण नगण्यच आहे. तसेच किरकोळ कारणातून खूनी हल्ले आणि मारामारीचे प्रकारही सर्रास घडत आहेत.तर क्षुल्लक कारणाचे परिणाम गंभीर घटनांमध्ये होऊ लागले आहेत. त्यामुळे वस्त्रनगरीतील गुन्हेगारी पुन्हा अधोरेखित होत आहे.
काही वर्षात शहराची वाढ आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरीकरण वाढत आहे, ग्रामीण भागातून शहराकडे येण्याचा कल मोठा आहे, असे वारंवार बोलले जाते आणि त्यावर चिंताही व्यक्त केली जाते. त्यापलीकडे मात्र त्याकडे बघितले जात नाही. वाढत्या शहरीकरणाची काही वाईट अपत्येही आहेत. त्यातीलच एक म्हणजे गुन्हेगारी. रोजगाराची संधी हिरावली गेली किंवा उत्पन्न मिळेनासे झाले की गुन्हेगारीकडे व्यक्ती जातात, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय पैसा, प्रतिष्ठा यासारख्या बाबी मिळवण्याचा शॉर्टकटसुद्धा गुन्हेगारीत आहे, असा समज असल्यानेही गुन्हे वाढत आहेत. छोट्या गुन्ह्यांमधून आलेला शहाणपणाच मोठ्या गुन्ह्यांचे धाडस करायला लावतो.
उन्हाळ्याच्या सुट्या लागताच शहरात चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या घटनांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. खुद्द पोलिसांकडेच असलेल्या आकडेवारीतून हे सिद्ध होते. गेल्या काही वर्षात चोरीच्या प्रकारांमध्ये राजरोसपणे जी वाढ झाली आहे ती खरे तर पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अडीच वर्षात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
सध्या किरकोळ कारणातून मारामारी आणि दुचाकी चोरीच्या घटना दिवसाला एक - दोन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतच आहेत. मारामारीच्या घटनांमध्ये घातक हत्यारे सहजपणे खुलेआम बाहेर काढली जात आहेत. अधिकारी बदलले की गुन्हेगारीची प्रवृत्ती बदलते अशी काहीशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहराला सध्या पूर्णवेळ पोलिस उपाधीक्षक दर्जाचा अधिकारीही नाही. तसेच अप्पर पोलिस अधीक्षकांसह प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांचा वचक कमी पडताना दिसत आहे. गुन्हेगारी घटना वेळीच रोखण्यासाठी प्रचंड सक्रिय असणारी पोलिस यंत्रणा सध्या कमी पडत आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
------
शहरातील पोलिस यंत्रणा
पोलिस ठाणे संख्या- ३
अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय - १
पोलिस उपाधीक्षक कार्यालय - १
शहर वाहतूक नियंत्रण शाखा - १
----
पोलिसांनी ‘अभिनव’ करावे
शहरात यापूर्वी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवली होती. तसेच ''फक्त एक मेसेज'' नावाचा अभिनव उपक्रमही तत्कालीन पोलिस उपाधीक्षकांच्या कार्यकाळात राबवला. अशाचपद्धतीने पोलिसांनी काहीतरी अभिनव केल्यास गुन्हेगारांवर वचक आणि गुन्हेगारी घटना टाळता येणार आहेत. घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारच अधिक असल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com