इचलकरंजीत बेंदूरासाठी बाजारपेठ सजली

इचलकरंजीत बेंदूरासाठी बाजारपेठ सजली

06409
इचलकरंजी : १) बेंदुराला लागणाऱ्या रंगीबेरंगी साहित्याने दुकाने सजली आहेत.
06408
२) मातीचे बैल तयार करून रंगवण्यात कुंभार बांधव दंग आहेत.
------------
इचलकरंजीत बेंदूरासाठी बाजारपेठ सजली
मागील दोन वर्षातील उलाढाल भरून निघेल असे चित्र
इचलकरंजी, ता.२ : बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाल्याने बेंदूर सणाची शर्यतप्रेमींमध्येही कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे यंदा सर्वाधिक बैल सजावटीच्या नानाविध रंगीबेरंगी साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. मागील दोन वर्षातील उलाढाल भरून निघेल असे चित्र बाजारात आहे. बेंदूर सणाला यंदा दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार नसल्याची बाब मोठा दिलासा देणारी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभागात कर्नाटकी बेंदूराला महत्व असते. त्यामुळे बेंदूर सणाच्या खरेदीतून इचलकरंजीत उलाढाल होत असते. कोरोना आणि शर्यतीवर असणारी बंदी यामुळे तीन वर्षे उलाढालीसह बेंदूरातील उत्साह हिरावला होता. यंदा शेतकऱ्यांचा उत्साह मात्र पेटून उठला आहे. बैलगाडी शर्यतीमुळे तर हा उत्साह आणखी वाढला असून बाजारात बैल सजावटीच्या साहीत्य खरेदीसाठी मागणी वाढली आहे. आपल्या सर्जा-राजाला सजवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी पशुपालक सरसावले आहेत.
यावर्षी सजावटीच्या साहित्यात रंगीबेरगी आणि विविधता अगदी ठळकपणे दिसत आहे. कासरा, गोंडे, माळा, कवड्यांच्या माळा, घुंगरू पट्टे, कंडा, हनपट, शेंबी, झुल असे नानाविध आकर्षक साहित्य विक्रीस आहे. बाजरपेठेत नवीन पद्धतीने आलेल्या म्होरक्या, सर, गोंडे, चंगाळ्या, मेणकापड यासोबतच झुली, शिंगाणा लावले जाणारे हिरंगुळे, शिंगोट्या, मटाट्या, घुंगर माळा, बैलाच्या शिंगांना लावण्यासाठीचे रंग अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. शर्यतीमुळे बैल पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आकर्षक वेताच्या काठ्यांची चलती आहे.
गल्लोगल्ली, घरोघरी कुंभार बांधवांची मातीचे बैल देण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच बाजारपेठेत मातीचे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचे बैल विक्रीसाठी येत आहेत. येत्या रविवारी बाजारात खरेदीचा सुपरसंडे ठरणार आहे. सोमवारी (ता.५) साजऱ्या होणाऱ्या बेंदूर सणाला बैल सजावट, मिरवणूक आणि सायंकाळी कर तोडणीचा सामूहिक कार्यक्रम यांची रेलचेल असणार आहे.
- - - - - - - - - - -
सुत गेले अन् नायलॉन, रेशीम आले
पारंपरिक सुताचा कासरा दुर्मिळ झाला आहे. बाजारात नायलॉन, रेशीमचे कासरे सर्रासपणे विक्रीस आहेत. दिसायला आकर्षक दिसणारे हे कासरे लक्ष वेधून घेत आहेत. नायलॉन, रेशीमचे रंगीबेरंगी बोड्यांच्या सजावटीच्या दोऱ्यांना अधिक मागणी आहे.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com