बेंदरानिमित्त शेतकऱ्यांकडून बैलांचा सन्मान

बेंदरानिमित्त शेतकऱ्यांकडून बैलांचा सन्मान

ich51,2,3.jpg
07239
इचलकरंजी: १) शेतकरी कुटुंबानी बैलांप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करत मनोभावे पूजा केली.
07240
२) बैल जोड्या सजवुन शहरात विविध भागात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.
07241
३) अंगावर झूल, शिंगांना रंगरंगोटी, गोंडे, गळ्यात घुंगूर असा थाटमाट करून बैलांना सजवण्यात आले.(पद्माकर खुरपे: सकाळ छायाचित्रसेवा)
---------------
बेंदरानिमित्त शेतकऱ्यांकडून बैलांचा सन्मान
इचलकरंजीत बैलजोड्या सजवून सवाद्य मिरवणूक; तरुणांमध्ये उत्साह
इचलकरंजी, ता. ५ : शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. बैल जोड्या सजवुन शहरात विविध भागात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. शर्यती पूर्ववत सुरू झाल्याने तरुणांमध्ये बेंदूर सणाचा मोठा उत्साह दिसून आला. कृतज्ञता भाव व्यक्त
करत शेतकऱ्याने वाजत गाजत बैलांना घरी आणून मनोभावे पूजा केली. यानिमित्ताने शेतकर्‍यांनी बैलांचा आज यथोचित सन्मानच केल्याचे चित्र पहायला मिळाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाचा वाद मिटत नसला तरी वस्त्रनगरी इचलकरंजीत संस्थानकालापासून कर्नाटक बेंदूर उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे. खरीप हंगामात तीन महिने रानात मालकाबरोबर राबणाऱ्या सर्जा राजाचा सण अर्थात बैलपोळ्याचा सण आज सोमवारी उत्साहात साजरा केला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. हे पाहण्यासाठी पंचगंगा नदी घाट परिसरात शेतकऱ्यांसह नागरिकांनी गर्दी होती. सकाळपासून पंचगंगा नदीघाट परिसरात बैलांना अंघोळ घालून आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.
दिवसभर शहरातील गावभाग परिसरात अनेकांची बैल पाहण्यासाठी वर्दळ दिसून आली. बैल सजवण्यासीची अनोखी क्रेझ दिसून आली. कान, डोळे अंगावर नानाविध रंगरंगोटी करून पाना फुलांचे नक्षीकाम केले. बैलाच्या पाठीवर बैलांची नावे अन् त्यांची खासियत रेखाटली. त्यात अंगावर झूल, शिंगांना रंगरंगोटी, गोंडे, गळ्यात घुंगूर असा थाटमाट केल्याने बैले देखणी दिसत होती. वाद्यांच्या तालावर बैलांना नाचवले जात होते. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा कर तोडण्याचा कार्यक्रम झाला.
- - - - - - - - -
पर्यावरणाचा जागर
जागतिक पर्यावरण दिन व कर्नाटकी बेंदूर एकत्र आल्याने याची विधायक छाप आज दिसून आली. अनेकांनी आवर्जून बैलाच्या पाठीवर झाडांची चित्रे काढत संदेशही दिले. पर्यावरण दिनामुळे बैलांच्या पाठीवरील नक्षीकामाला अनोखी जोड मिळाली. हेच काहीसे संदेश प्रेरणा देणारे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com