''नमामि कृष्णा''; केवळ घोषणाच

''नमामि कृष्णा''; केवळ घोषणाच

05397
जयसिंगपूर: गावागावातील सांडपाणी थेट कृष्णेत सोडले जात आहे.
-------------------
''नमामि कृष्णा''; केवळ घोषणाच
प्रदूषणात भर; जलवाहिनी बनली विषवाहिनी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

गणेश शिंदे: सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.१०: शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीपाठोपाठ कृष्णा नदीही प्रदूषणाच्या दृष्टचक्रात सापडली आहे. केंद्राने ''नमामि गंगे''चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारनेदेखील ''नमामि कृष्णा'' अशी घोषणा केली. मात्र, ती पोकळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी नदीकाठच्या गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहेच शिवाय शेतीही नापीक होण्याचा धोका वाढला आहे.
कृष्णा नदी सध्या विषवहिनी बनली आहे. मोठमोठ्या प्रकल्पांचे रासायनिक पाणी, गावागावातील सांडपाणी यामुळे कृष्णेची ही अवस्था बनली आहे. दोन-चार वर्षांपूर्वी नदीतील पाण्याचा रंग हिरवा दिसायचा. तो आता काळपट दिसू लागला आहे. शिवाय महापुरात स्वच्छ झालेल्या नद्या नियमित स्वच्छ राखता आल्या नाहीत. शिरोळ तालुक्यात चार नद्यांचा संगम आहे. मात्र, या चारही नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. वारणा नदीचे पात्र स्वच्छ होते. मात्र काही दिवसांत वारणेच्या पात्रातही प्रदूषणाची भर पडू लागली आहे. पावसाळ्यात तालुक्यातील जवळपास ४३ गावांना महापुराचा फटका बसतो. पावसाळ्यात लोकांना जेरीस आणणाऱ्या या नद्या उन्हाळ्यातही धोक्याच्या बनल्या आहेत. प्रदूषणामुळे जलचर मरण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने पंचनामे आणि नोटिसा लागू केल्या जातात. यापलीकडे कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीचे प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न आणखी तीव्र करण्याची गरज आहे.
कृष्णेच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. शिवाय पुलावरून पाहिल्यास पाण्याचा काळपटपणा स्पष्टपणे दिसून येतो. गेल्या ४८ वर्षांपासून नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीचा लढा सुरू आहे. या काळात मंत्र्यांना निवेदन दिली. सातत्याने यावर चर्चा झाली. मात्र प्रत्यक्षात कृष्णा प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस पावले पडलीच नाहीत. त्यामुळे ''नमामी कृष्णे''चा विसर सरकार पडला आहे हे मात्र नक्की.
....

प्रदूषणाची ठळक कारणे
* उद्योगांचे रासायनिक पाणी प्रक्रियेविना नदीपात्रात
* नदीकाठच्या बहुतांश गावांचे सांडपाणी थेट नदीत
* उद्योगांमधील केमिकलच्या पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बंद
* माती उपसा, वाळू उपसा
* शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर
* पाणी वाहते नसल्याने सूर्यप्रकाशाद्वारे होणारे शुद्धीकरण प्रक्रिया थांबली
* नदी स्वच्छ करणारे मासे नष्ट झाले आणि जलपर्णी वाढली
....

तेलंगणा आराखड्याच्या पुनर्बांधणीची गरज
कृष्णा प्रदूषणमुक्त करण्यासाठी तेलंगणा राज्यातील तत्कालीन मंत्री व्ही प्रकाश यांनी कृष्णा पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठीही समितीची नेमणूक केली. मात्र राज्यातील सत्ता संघर्षात समितीचे कामकाज ठप्प राहिले. आराखड्याची नव्याने बांधणी करून कार्यवाही करण्याची गरज आहे.
....

कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीसाठी शासन पातळीवर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगांना दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणीला चालना दिली पाहिजे. शिवाय गावागावातील सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया व्हावी यासाठी भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. कृष्णा प्रदूषणमुक्तीसाठी वेळीच उपायोजना केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सर्वच घटकांना याची किंमत मोजावी लागेल.

-विकास पाटील, सदस्य ग्रामपंचायत, अर्जुनवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com