प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा

प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा

03246, 03244
लोगो : कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरण


रस्त्याची उंची माजवेल हाहाकार
पूर टप्प्यात सहा फूट वाढणार; ‘करवीर’मध्ये गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार

कुंडलिक पाटील
कुडित्रे, ता. २१ : कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरण सुरू आहे. दोनवडे ते बालिंगादरम्यान पूर येणाऱ्या रस्त्याची उंची दोन मीटर म्हणजे सहा फुटांनी वाढणार आहे. यामुळे महापूर येऊन करवीर तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान होणार असून भविष्यात गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दै.‘सकाळ’मधून रुंदीकरणाबाबत बातम्या प्रसिद्ध होताच आज पूरग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-कळे रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. दहा मीटरचा कॉंक्रीटचा रस्ता होणार आहे. सध्या दोनवडे-बालिंगा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात आहे. भराव टाकण्यापूर्वी २०१९ आणि २०२१ मध्ये मोठा महापूर भोगावती व पंचगंगा नदीला आला होता. बहुतांश गावांतील ५० टक्के घरे पुराखाली गेली आणि अनेक गावांतील ३०० ते ५०० एकरातील पिकांचे नुकसान झाले. याच्या स्मृती ताज्या असतानाच रुंदीकरणाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.
याबाबत संबंधित उपकार्यकारी अभियंतांशी रस्त्याच्या उंची, प्लॅनबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्या भेटू, असे सांगितले. दरम्यान बालिंगा येथील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी दोनवडेच्या बाजूला दोन मोऱ्या करणार आहोत. एक नवीन मोरी दहा बाय दहा फुटांची करणार आहोत. बालिंगाच्या बाजूला एक मोरी व मुख्य पूलाला पर्यायी पूल होणार असून रस्त्याची उंची दोन मीटर म्हणजेच सहा फुटांनी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुंदीकरणापूर्वी २०२१ मध्ये येथे रस्त्यावर २२ फूट पुराचे पाणी होते. रस्त्याची उंची सहा फुटांनी वाढल्यानंतर हाहाकार माजेल, असे चित्र आहे. या रस्त्यापासून बालिंगा, दोनवडे, वाकरे, कुडित्रे, सांगरूळ, पाडळी, कोगे, महे, बीड, आरे अशा अनेक गावांना पाण्याचा मोठा वेढा पडेल. पीक नुकसानीसह गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्याला मोऱ्या कराव्या व उंची वाढवू नये, अशी मागणी होत आहे.

चौकट
सोशल मीडियावर संताप
दैनिक ‘सकाळ’मधून रस्ता रुंदीकरण आणि भविष्याचे प्रश्न यावर बातमी प्रसिद्ध होताच आज सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

कोट
सर्व गावांच्या सरपंचांना एकत्र करून कमिटी तयार करण्याचे नियोजन आहे. आमदार खासदार व संबंधित खात्याला निवेदन देण्यात येणार आहे.
- मधुकर जांभळे, राजेंद्र सूर्यवंशी

चौकट
येथून पाणी सरकेल...
रस्त्याच्या दुतर्फा भराव टाकला जात आहे. खडीकरणासाठी संबंधित खात्याने डोंगरात दगड खणीसाठी जागा खरेदी केली असून येथून मोठ्या प्रमाणात मुरूम, माती असा भराव येथे टाकला जात आहे. यामुळे येथील पुराचे पाणी मागे गावागावांत सरकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com