खोचीत चैत्र यात्रेची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोचीत चैत्र यात्रेची सांगता
खोचीत चैत्र यात्रेची सांगता

खोचीत चैत्र यात्रेची सांगता

sakal_logo
By

02560
खोची ः १) येथील पाकाळणी यात्रेनिमित्त भैरवनाथ, जोगेश्वरी यांची बांधलेली पूजा.
02561
२) भैरवनाथांचा चैत्र यात्रेचा पाकाळणी पालखी सोहळा झाला.
--------------
खोचीत चैत्र यात्रेची सांगता
भैरवनाथांचा पाकाळणी पालखी सोहळा; खारीक, गुलाल-खोबऱ्याची उधळण
खोची, ता. २० ः येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या पाकाळणी पालखी सोहळ्याने चैत्र यात्रेची सांगता झाली. लाखभर भाविकांनी पालखी सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. भैरवनाथ व जोगेश्वरीचा जयघोष, खारीक, गुलाल-खोबऱ्याची उधळण व चांगभलचा गजर झाला.
भैरवनाथाची यात्रा ६ एप्रिलपासून सुरू झाली होती. ती तीन टप्प्यात झाली. पंधरा दिवस चाललेल्या या यात्रेची सांगता पाकाळणी यात्रेने झाली. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता पालखी सोहळा व हलगीच्या तालावर नाचणाऱ्‍या गगनभेदी सासणकाठ्या व आकर्षक व नयनरम्य आतषबाजीने मन मोहवून टाकणारे दृश्य पहावयास मिळाले. दुसर्‍या टप्प्यात गावयात्रा साजरी करण्यात आली. आज (ता.२०) भैरवनाथाची पाकाळणी यात्रा झाली. श्रींची पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. दुपारी बारा वाजता ‘श्रीं ची आरती झाल्यानंतर पालखीने मानाच्या अश्वासह मंदिराला प्रदक्षिणा घातली व पालखी सोहळा सुरु झाला. पालखी गाभाऱ्यातून बाहेर येताच भाविकांनी भैरवनाथ व जोगेश्वरीच्या नावानं चांगभल, काळभैरीच्या नावानं चांगभलच्या गजरात पालखीवर खारीक, गुलाल खोबऱ्याची उधळण केली. गुरव, गोसावी, डवरी यांच्यासह सेवेकऱ्‍यांसमवेत पालखी सोहळा लवाजम्यासह वारणा नदीतीरावर आला. तत्पूर्वी सईच्या झाडाखाली असलेल्या भैरवनाथाच्या मुळस्थानी श्रींची आरती केली. त्यानंतर वारणा नदीतीरावर उत्सव मूर्तीला स्नान घातले. त्यानंतर पालखी सोहळा परतीच्या मार्गाला लागला. पालखी पळवत मंदिराच्या आवारात आणली. त्यानंतर भाविकांनी व महिलांनी उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले व गुलालात न्हाऊन घरी परतले. त्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरात विराजमान झाली. गुरव, गोसावी, डवरी समाजाने देवदेवतांना श्रीफळ, नैवेद्य अर्पण केला.