धरणग्रस्त गावातील आठवणींच मोहोळ...!

धरणग्रस्त गावातील आठवणींच मोहोळ...!

लोगो ः रिपोर्ताज
सदानंद पाटील

धरणग्रस्तांच्या मनात
आठवणींचे काहूर!

पाटगावच्या पाण्यात बुडालेल्या गावचे अवशेष दिसताच भरतात डोळे

कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी लाड कुटुंबीयांच्या चहा टपऱ्या आहेत. वसंतराव लाड यांची टपरी शाहूपुरीतील तिसऱ्या गल्लीत. ते मूळचे भुदरगड तालुक्यातील तांब्याच्यावाडीचे. गाव धरणात गेलं अन्‌ त्यांनी कोल्हापूरची वाट धरली. चाळीसहून अधिक वर्षे त्यांचे कोल्हापुरात वास्तव्य. गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पाटगाव धरणात बुडालेल्या निर्मनुष्य गावाच्या आठवणींचं गाठोडं उलगडताना ते थांबत नाहीत. त्यांची भेट घेण्यासाठी शाहूपुरी गाठली. मग तांब्याच्यावाडीचा फेरफटका केला. धरणात बुडालेल्या घरांचे अवशेष पाणी कमी झाल्यानंतर मे महिन्यात पाहायला मिळतात, असे गावकऱ्यांनी सांगितले.
....................

धरणातील गावात दीडशे घरे
तांब्याचीवाडी गाठली आणि अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. १९९० मध्ये पाटगाव धरण पूर्ण झालं आणि या धरणाच्या पाण्यातच मूळच्या तांब्याचीवाडीच्या आठवणी गाडल्या गेल्या. त्यावेळी हणमंते, तांब्याचीवाडी असे गाव होते. धरणाच्या एका कोपऱ्यावर दीडशे घरांचे गाव होते. पाचशे ते आठशे लोक राहायचे. रस्‍ते नसल्याने आताच्या धरणातूनच त्यावेळी पाटगावला सात-आठ किलोमीटर चालत यावे लागे. पुनर्वसन होण्यापूर्वी अनेकांचे बालपण याच गावात गेले. लग्नेही गावातच झाली. गाव उठले आणि लोक तळी, आडे येथे शेतात राहायला गेली. अनेकांना शिवडाव, शिवाजीनगर व पाळ्याचा हुडा येथे जागा देण्यात आल्या, लोक सांगत होते.

सातेरीदेवीची मूर्ती तीन वर्षे पाण्यात
नव्याने आडी, तळी वाड्यांच्यामध्ये तांब्याचीवाडी ग्रामपंचायत वसली. सातेरीदेवीची मूर्ती धरण क्षेत्रात पाण्यात होती. त्यानंतर १९९९ ला नव्याने मंदिर बांधले. पंढरपूरवरुन नवी मूर्ती आणण्यात आली. कालांतराने धरणातील जुन्या मूर्तीची नव्या मंदिर परिसरात प्रतिष्ठापना केली. शंकर धोंडी पाटील यांनी १९८४ पासून गावकऱ्यांच्या साह्य केले. गावकऱ्यांना सुरवातीला धरणाबाबत काहीच माहीत नव्‍हते. धरणाची भिंत बांधून झाल्यानंतरही धरणातूनच ये-जा सुरू होती. गाव उठले तरी लोकांना काही लाभ मिळत नव्‍हता. कोल्‍हापुरातील श्रमिक संघटनेचे नेते मदतीला धावले. त्यामुळे काही लोकांना जमिनी मिळाल्या. एकवेळ अशी आली की, जमिनीही नाही आणि पैसेही नाही. यावेळी शंकर धोंडी पाटील, कवडे साहेब यांनी मदत केली. आंदोलनानंतर जमिनी देण्यास सुरुवात केली. एजंटांनीही त्रास दिला. १९९५-९६ला गाव पूर्ण रिकामे झाले. हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

गावात दोनशे फूट खोल विहीर
वसंतराव लाड काका सांगू लागले. ‘‘लोकांनी जीवावर दगड ठेवून जुनी घरे उतरली. गावात सर्व गवताची घरं होती. होळीचा सण आला की, अंगावर शहारे यायचे. रात्री बत्त्या लावून गावातून प्रत्येकाच्या घरी जात होतो. शिकार झाल्यानंतर देवपूजा केली जायची. मूळ गावात प्रवेशानंतर मोठे आंब्याचे झाड होते. तेथेच शाळा होती. दोन गल्‍ल्या होत्या. टपाल कार्यालय नारायण लाड यांच्या घरात होतं. त्यांच्या पुढे ग्रामपंचायत कार्यालय. बाजूला किरणा दुकाने. गावात ७५ टक्‍के बंगलोरी व माळाची घरे होती. गायमुख वेदगंगा-नदीचा उगम वेताच्या काठीतून व गायमुखातून असे सांगतात. ते ठिकाण पाहण्यासारखे होते. गावात दोनशे फूट खोल विहीर होती. तीच गावची तहान भागवायची. ओझरचं पाणी एकदम स्‍वच्‍छ आणि फ्रीजला भारी पडेल असे."

सात मैल पायी प्रवास...
त्यानंतर एकनाथ लाड भेटले.. म्हणाले, ‘‘आता सरकारी यंत्रणा येते, तशी पूर्वी पोचत नव्‍हती. कच्‍चे रस्‍ते होते. सहा-सात मैल डोलीत घालून आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी पाटगावला घेऊन जावे लागे. कोणतीही सुविधा नव्हती. एका पुलाचे बांधकाम झाले होते. आजही काहीही बदल नाही. चिक्‍केवाडी आमचाच भाग. नाचणी, भात, तीळ व काळी तसेच पांढरी वरी एवढेच उत्‍पादन होते. आजही काळ्या तिळाचे तेल काढून आम्‍ही वापरतो.’ गावात लाड, परब, गवळी, धोंड, निरुखेकर, चव्‍हाण, सुतार यांची गावात घरे. जुन्या गावात ७५ टक्‍के लाड आडनावाची कुटुंबे. लाड हे कोकणातून आल्याचे सांगतात. करुळ घाटातील येडगावातले. तेथील एक भाऊ तांब्याचीवाडी येथे तर एक कुंडलला गेल्याचे सांगतात. तांब्याचीवाडी गावात तांबे आडनावाचे एक कुटुंब होते, तर गावात ताम्रपट होता, म्‍हणून तांब्याचीवाडी नाव गावाला पडल्याची आख्यायिका आहे. अनुभव ऐकले. आम्ही परतीच्या वाटेला लागलो; मात्र, धरणात बुडालेले गावचे अवशेष पाहण्यासाठी मेमध्ये पुन्हा जाण्याचे नक्की केले.
...
कोट
जुन्या गावातच आमचं बालपण गेलं. उन्‍हाळ्यात पाणी कमी होतं. त्यावेळी जुनं घर, गल्‍ली, शाळा अगदी हुबेहूब डोळ्यासमोर येते. अनेक आठवणी गावासोबत जोडल्या आहेत. धरणानं आमची घरं पुसली; मात्र मनात आमचा हा गाव जसाच्या तसा आहे. आजही या पाण्याखालचे गाव आठवले की गदगदून येते.
- प्रकाश कांबळी, माजी सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com