शाळांचे दस्तावेज अडगळीत

शाळांचे दस्तावेज अडगळीत

शाळांचे दस्तावेज अडगळीत
महापालिकेकडून संवर्धनाची गरज; जात पडताळणी, रहिवाशी दाखले काढताना अडचणी
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ : शहरात संस्थान काळापासून शाळेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यामधून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून देश-विदेशात शहराच्या नावाचा डंका वाजविला आहे. मात्र, सध्या या शाळांमधील पुरातन दस्तावेजांची दुरवस्था झाली आहे. १९७५ पूर्वीचे दाखल्यासह अन्य दस्तावेज अडगळीत ठेवण्यात आले आहेत. परिणामी, जात पडताळणी, रहिवाशी दाखले, वंशावळसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या दस्तावेजांच्या करिता रेकॉर्ड विभागाची निर्मिती करणे आवश्यक बनले आहे.
इचलकरंजी महापालिकेकडून डिसेंबर १९६४ साली शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषेदेकडे असलेल्या सुमारे सात शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या. मुलांची संख्या वाढत गेली तसे शाळांची संख्या ही वाढत गेली. १९७४ मध्ये महापालिकेच्या ५६ शाळेमधून शिक्षण देण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यानंतर खासगी शाळेंची संख्या वाढत गेली तसे महापालिकेच्या शाळेंमधील विद्यार्थी संख्या कमी होत गेली. परिणामी, एक-दोन वर्ष कालावधीच्या अंतराने शाळा बंद पडत गेल्या. या शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी यांच्या अन्य शाळेत विलीनीकरण झाल्याने जुन्या शाळेंचे दस्तावेज ही वर्ग करण्यात आले. विलीनीकरण झालेल्या काही शाळेंचे दस्तावेज सध्या गाव भागातील महादेव मंदिर परिसरामध्ये आलेल्या शाळेमध्ये ठेवले आहे. मात्र, येथे जागा अपुरी व आवश्यक व्यवस्था नसल्याने दाखले, दस्तावेज खराब होत आहेत.
इचलकरंजी महापालिकेकडे स्वतंत्र शिक्षण मंडळ व त्यासाठी बजेट निर्धारित आहे. असे असतानाही या दस्तावेजांच्या संवर्धंनासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जीर्ण झालेल्या दस्तावेजांचे स्कॅनिंग होणे आवश्यक असते. मात्र, असे होत नसल्याने रहिवाशी, जातीचा दाखला, जात पडताळणीकरिता गरजेचे असलेली दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तर चार-पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या दाखल्याचे दुबार मागितले असता रेकॉर्ड नसल्याचे कारण देण्यात येत आहे. आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या शिक्षण व त्यासंबंधीच्या कागदपत्रासोबत असलेले भावनिक नाते तुटताना दिसत आहे. या दस्तावेजांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
----
कोट
महत्त्वाचे दस्तावेज, जर्नल रजिस्टर एक नंबरच्या व त्यानंतर ११ नंबर शाळेमध्ये वर्ग केले आहेत. जीर्ण झालेल्या दस्तावेजांचे डिजिटल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
- नम्रता गुरसाळे, शिक्षण अधिकारी महापालिका
---------------
चौकट
विद्यार्थ्यांच्या पट संख्येत घसरण
महापालिकेच्या शाळेमधून शिक्षण घेऊन अनेकांनी मोठी मजल मारली आहे. १९९६ मध्ये मराठी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २७ हजारांहून अधिक होती. सध्या ४७ शाळेमध्ये केवळ सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचे महापालिकेने आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com