शिवजयंती

शिवजयंती

83730
कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळातर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अमर अडके.

गडकोटांवर जागोजागी
शिवछत्रपतींची प्रेरणा
डॉ. अमर अडके; शिवाजी तरुण मंडळातर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : गडकोटांच्या पायवाटा धुंडाळाल तर शिवछत्रपतींची प्रेरणा जागोजागी मिळेल, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी आज येथे केले.
शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘सह्यादी, स्वराज्य व छत्रपती शिवराय’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. उभा मारुती चौकात त्याचे आयोजन केले होते.
डॉ. आडके म्हणाले, ‘‘सह्याद्री दऱ्या-खोऱ्यांत स्वराज्य वसले होते. पर्वतरांगावर डौलाने उभे असलेले गडकोट स्वराज्याचे वैभव होते. शत्रूला चकवा देण्यात मराठे कमी नव्हते. भौगोलिक स्थितीचा विचार करून शिवरायांनी गडकोटांची उभारणी केली होती. एक किल्ला जरी वर्षभर लढला, तरी शत्रूला मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेता येणार नाहीत, असा त्यांनी सारासार विचार केला होता. गडकोटांच्या साह्याने मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे यांनी अद्वितीय शौर्य गाजवले. शिवरायांचे ते निष्ठावान सेवक होते. स्वराज्यासाठी बलिदान कसे करावे, याची शिकवण त्यांनी दिली.’’
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी ‘पानिपत मराठ्यांचे शौर्यपीठ’ विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अब्दालीविरुद्ध पानिपत येथे झालेल्या लढाईत मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. लढाईत बचावलेले मराठे तेथेच राहिले. आजही त्यांच्या पिढ्या येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या चालीरिती मराठ्यांप्रमाणेच आहेत. त्यांचा संशोधनात्मक अभ्यास केल्यानंतर ते रोड मराठे असल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी पानिपत येथे मराठ्यांच्या पराक्रमाला उजाळा दिला जातो. रोड मराठा समाज तेथे एकत्र येऊन पूर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण करतो.’’ या वेळी सरिता देसाई यांनी नेसरी खिंडीत सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहलोलखानाविरुद्ध गाजविलेल्या पराक्रमाची माहिती दिली. या वेळी राजर्षी शाहू सलोखा मंचचे कादर मलबारी, बबन रानगे यांचा सत्कार झाला. या प्रसंगी डॉ. डॉ. चेतन नरके, व्ही. बी. पाटील, सुजित चव्हाण, महेश जाधव, अजित राऊत उपस्थित होते. दरम्यान, मंडळातर्फे आरोग्य शिबिरही झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com