सुमंगल महोत्सव शोभायात्रा

सुमंगल महोत्सव शोभायात्रा

83945
...

‘सुमंगल’मधून चळवळ उभी राहील

मुख्यमंत्री शिंदे : शोभायात्रेतून बहुविध संस्कृतींचे दर्शन, पंचगंगेचे पूजन, महाआरती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १९ : ‘अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या सुमंगल लोकोत्सवानिमित्त महाशोभायात्रा निघाली, पंचगंगा नदीचे पूजनही झाले. गंगा आरतीसारखे मंगलमय वातावरण झाले. न भूतो न भविष्यती अशा या लोकोत्सवात लाखो लोक सहभागी होतील, यातून चळवळ उभी राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर उद्या सोमवार (ता. २०) पासून सुरू होणाऱ्या सुमंगल लोकोत्सवानिमित्त शहरातून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या निमित्ताने पंचगंगा नदीचे पूजन व महाआरती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाली. तसेच सुमंगल महोत्सवाचे अनौपचारिक उद्‍घाटन झाले, या वेळी ते बोलत होते. काडसिद्धेश्वर स्वामींनी आजवर जे जे कार्य केले ते यशस्वी केले आहे. त्यानुसार लोकोत्सवही यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.
गांधी मैदानात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्‌घाटन झाले. पारंपरिक कलावंताच्या सहभागात शोभायात्रा निघाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी येथे यात्रा आली असता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आगमन झाले. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे पंचगंगा नदीकडे महाआरतीसाठी शुक्रवार पेठ कसबा गेट चौकातून पायी चालतच नदीघाटावर निघाले. तेथे त्यांच्या हस्ते नदीचे पूजन व आरती झाली.
...

मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कोल्हापुरात प्रथमच आलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे गंगावेश येथे शहर शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत झाले. जवळपास १०० फूट उंचीचा फुलांचा हार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना घालण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. देशाच्या विविध प्रांतातील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते पंचमहाभूतांची तत्त्‍वे समजून घेण्यासाठी ३० लाखांवर लोक उत्सवात येतील, असा विश्वास काडसिद्धेश्वर स्वामी यांनी या वेळी व्यक्त केला. पंचगंगा नदी घाटावर सायंकाळी भरतनाट्यम्‌सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
...

शोभायात्रेला उदंड प्रतिसाद

पंचमहाभूतांची तत्त्‍वे विषद करणाऱ्या सुमंगल महोत्सवाच्या शोभायात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. देशाच्या बहुविध संस्कृतींचे दर्शन यात्रेतून घडले. ओरिसा, कर्नाटकातील लोकनृत्य, महाराष्‍ट्रातील आदिवासी, कोळी, लेझीम, झांजपथक नृत्याला ढोल-ताशा, दिमडी, ढोलकी, डफली, तुतारी आदी वाद्यांनी शोभायात्रेत ताल सूर दिला, तसा शोभायात्रेत जोश भरला. ओरिसा, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय लोककलावंतांच्या पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. गुरुकुल पद्धतीच्या युद्धकलेपासून ते कलाकुसरींचे दर्शन घडविणाऱ्या नृत्य प्रात्याक्षिकांनी शोभायात्रेला कलात्मकतेचे रूप दिले. श्रद्धा, भक्ती, ज्ञानाजर्नाचा संदेश देणाऱ्या रथाने शोभायात्रेची भव्यता दर्शवली. शोभायात्रा पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली, फुलांचा वर्षावही झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com