इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

ich1914.jpg
83963
इचलकरंजी ः कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोणजवळ मोठी गळती लागली आहे.
---------------
इचलकरंजीत पाणीटंचाईचे संकट
कृष्णा योजनेला पुन्हा गळती; ३० मीटर जलवाहिनी बदलणार
इचलकरंजी, ता. १९ : शहरात पुढील काही दिवस भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला पुन्हा शिरढोणजवळ मोठी गळती लागली आहे. शनिवारी रात्री यापूर्वी लागलेली गळती काढून पाणी उपसा सुरू केला होता. त्यानंतर आज त्याच परिसरात मोठी गळती लागली असून परिसरातील एक एकर शेतीमध्ये पाणी पसरले आहे. सातत्याने या परिसरात गळती लागत असल्यामुळे ३० मीटर जलवाहिनीच बदलण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. हे काम तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता आहे. परिणामी, कृष्णा नदीतून होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे.
शहराला बहुतांशी पाणीपुरवठा कृष्णा नदीतून केला जातो. या योजनेची जलवाहिनी शिरढोणनजीक खराब झाली आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच गळती लागते. त्यामुळे शहरातील सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. चार दिवसांपूर्वी लागलेली गळती काढण्याचे काम शनिवारी रात्री पूर्ण केले. त्यानंतर कृष्णा नदीतून उपसा सुरू केला. पण पाण्याच्या दाबामुळे शिरढोणमधील बाणदार हायस्कूलजवळ जलवाहिनी फुटली. यातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे परिसरातील एक एकर शेती पूर्णपणे भिजली. ही माहिती मिळताच कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. जलवाहिनी पूर्णपणे ठिसूळ झाली असून वेल्‍डिंग करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या परिसरातील ३० मीटर जलवाहिनीच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पर्यायी पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरूच राहणार आहे. मात्र शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होऊन चार ते पाच दिवसांनंतर नळाला पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
----
चार महिन्यांत दहा वेळा गळती
कृष्णा योजनेची बहुतांश जलवाहिनी बदललेली आहे. उर्वरित जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. उर्वरित जलवाहिनी पू्र्णतः खराब झाली आहे. त्यामुळे चार महिन्यात तब्बल दहा वेळा जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com