
शिवाजी विद्यापीठाचे कामकाज पूर्ववत सुरू
फोटो (KOP23L84620)
..........
शिवाजी विद्यापीठाचे कामकाज पूर्ववत सुरू
प्रशासनाला दिलासा; अन्यथा ११ मार्चपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे सुधारित इतिवृत्त राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री घेतला. या निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचारी बुधवारी कामावर रुजू झाल्याने शिवाजी विद्यापीठाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाला दिलासा मिळाला.
विद्यापीठातील आंदोलनस्थळी सकाळी दहा वाजता शिवाजी विद्यापीठ सेवक संघ आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी, सभासद शिक्षकेतर कर्मचारी जमले. तेथील सभेत यावेळी कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले आणि आनंद खामकर यांनी समितीच्या मंगळवारी रात्री झालेल्या चर्चा आणि त्यातील निर्णयाची माहिती दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मिळालेल्या इतिवृत्तानुसार अंमलबजावणीसाठी प्रशासकीय प्रक्रियेकरिता शासनाला वेळ देण्यासाठी १० मार्चपर्यंत कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. या कालावधीत मागण्यांच्या पूर्ततेबाबत अंमलबजावणी झाली नाही, तर ११ मार्चपासून आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय समितीने कायम ठेवला असल्याची माहिती त्यांनी दिली. या सभेनंतर पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यरत विभाग, अधिविभागात काम सुरू केले.
...
परीक्षांच्या कामकाजाला गती
गेल्या २१ दिवसांपासून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परीक्षाविषयक कामकाजावर बहिष्कार होता. आंदोलन स्थगित झाल्याने अंतिम टप्प्यात आलेल्या परीक्षांच्या कामकाजाला गती मिळणार आहे. दीक्षान्त समारंभाच्या अनुषंगाने काही कामे प्रलंबित राहिली आहेत, तीदेखील लवकर पूर्ण होणार आहेत.