संजय राऊत प्रेस

संजय राऊत प्रेस

बनावट शिवसेनेचे हे ‘चोरमंडळ’
संजय राऊत; जाब विचारणाऱ्याला तुरुंगात टाकण्याचे षड्‌यंत्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः जी बनावट शिवसेना तयार झाली आहे, ते विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले म्हणून आम्ही पक्ष सोडणारे नाही. अशी अनेक पद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिली आणि आम्ही ती पक्षासाठी ओवाळून टाकतो, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे केली.
श्री. राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आम्ही लफंगे नाही. गेलेली पद पुन्हा येतील; मात्र आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. लोकांची गर्जना काय आहे, हे मंगळवारी आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने माजी मंत्री बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना आहे. ही गर्जना पोहचविण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात जात आहोत.’’

कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे, हे दिसून आले. दौऱ्यानिमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करू, असे सांगून ते म्हणाले, ‘‘सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चिट देण्यात आली; पण दुसरीकडे जो जाब विचारतो, त्याला तुरुंगात टाकायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचे असे षड्‌यंत्र रचले जात आहे. जनता २०२४ ला याचा सर्व हिशेब करेल. कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा उत्तमरीत्या चालवण्यात आल्या. त्या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्वतः सांगितले. कोविडसंदर्भात गुन्हा दाखल करायचे असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा. अनेक मृतदेह गंगेतून वाहून गेले. केंद्र सरकारने सगळ्यात पहिला ३०७ चा गुन्हा आदित्यनाथ यांच्यावर नोंद केला पाहिजे. इतकच नव्हे तर कोविड काळात गुजरातमध्ये स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी सर्वात प्रथम त्याठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा.’’
राऊत यांनी आरोप केला, की महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय आहेत. ज्यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे, त्यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचा आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणूक आपण हरत आहोत, हे जेव्हा भाजपला कळले; तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला. यंत्रणेचा वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल.’’ चिंचवडची जागा जात आहे, हे तुम्हाला कळालेली माहिती चुकीची आहे. कारण चिंचवडची जागा आमच्याकडे नव्हती. कसब्याची जागा भाजपकडून जातीय, ही खरी बातमी आहे. ही जागा ३०-३५ वर्षे भाजपकडे आहे. चिंचवडची जागा कोण जिंकेल, हे भाजपला सांगता येत नाही. हा भाजपचा पराभव आहे, असेही ते एका प्रश्नावर म्हणाले.

‘विक्रांत’चे पैसे गेले कोठे
आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोराने म्हणजे किरीट सोमय्या यांनी लाखो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदलले आणि चौकशी थांबली, पण मी विक्रांतचे पैसे कोठे गेले, हे विचारणार आहे. त्यासाठी न्यायालयात जाऊ, असा इशाराही राऊत यांनी दिला. सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कोठे ठेवला, हे आधी सांगावे आणि मग बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

गायींच्या मृत्यूची चौकशी करा!
ते म्हणाले, ‘‘पालघरमधील साधूंचा मृत्यू आणि कणेरी मठावरील गायींचा मृत्यू आम्ही समान मानतो. कणेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. आमचे आमदार आज विधिमंडळात गायींना श्रद्धांजली वाहतील.’’

मी स्वत: राज्यसभा खासदार आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचा मी आदर करतो. शिवसेनेतून पळून जाण्याबरोबरच त्या ४० आमदारांनी पक्षाच्या नावासह चिन्हही चोरले आहे. त्यांच्याबद्दल मी चोर मंडळाचा उल्लेख केला आहे; विघिमंडळाला नव्हे. शिवसेनेतून पळून गेलेल्या ४० आमदारांचे चोर मंडळ विघिमंडळात असल्याचे मी म्हणालो; परंतु या माझ्या विधानाचा विपर्यास्त केला गेला. त्यावरून अधिवेशनात माझ्या नावे ठणाठणा सुरू झाला. माझ्याविरोधात हक्कभंग आणल्याचेही मला आत्ताच समजले.
- संजय राऊत, गडहिंग्लज येथील सभेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com