अपहरण साईड स्टोरी

अपहरण साईड स्टोरी

फोटो
...

रात्रीत ओळख झाली, सकाळी अपहरण केले

फिरस्त्या दाम्पत्याची चलाखी ः बाळूमामा मंदिरातून अपहरण, चिंचणी मायाक्काचे दर्शन घेऊन घरी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ७ ः ते दाम्पत्य फिरस्ते... मुलाची आईसुद्धा फिरस्ती. दोघांनाही मंदिराच्या ठिकाणी जाणे, थांबणे आणि तेथून पुन्हा दुसऱ्या मंदिरात जाणे हीच त्यांची दैनंदिनी. बाळूमामाच्या मंदिरातही मोफत राहण्यासाठी मिळाल्यामुळे ते तेथे एक रात्र राहिले. त्यावेळी त्या दाम्पत्याची व या फिरस्ती आई-मुलाची भेट झाली. त्यांच्या मागे-पुढे कोणी नाही, याचाच अंदाज घेऊन त्या दाम्पत्याने सहा वर्षांच्या मुलाला उचलले. दुचाकीवर बसविले आणि ते घेऊन गेले. पाठीमागून तुझी आई येत आहे, असे त्या मुलाला सांगण्यात येत होते; मात्र त्यांच्या मागून थेट पोलिस आले आणि त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या.

पोलिस रेकॉर्डवरील माहितीनुसार, फिरस्त्या दाम्पत्यातील पती मूळचा साताऱ्याचा. पत्नी मृत झाली म्हणून त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. हक्काचा कामधंदा काहीच नाही. म्हणून ते फिरस्ते होते. कधी पंढरपूर, कधी सोलापूर, तर कधी आदमापूर अशा वेगवेगळ्या मंदिरांच्या ठिकाणी ते फिरत होते. पाच महिन्यांपूर्वीच ते सोलापुरात स्थायिक झाले आहेत. सात मार्चला पौर्णिमा असल्यामुळे ते तीन मार्चलाच आदमापुरात दाखल झाले. याचवेळी मूळची सातारची पण सध्या पंढरपूर-सोलापुरात अधिक वास्तव्य असलेली फिरस्ती महिला सहा वर्षांच्या मुलासह कोल्हापुरात आली. एसटी स्टॅण्डवरून तिने थेट आदमापूर गाठले. तीन मार्चच्या रात्री आमदापूर येथे तिची फिरस्त्या दाम्पत्याशी ओळख झाली.
एका रात्रीत त्यांची तोंडओळख झाली. दुसऱ्या दिवशी मुलाची आई अंघोळीला गेलेली पाहून त्या मुलाला दुचाकीवर घेऊन हे फिरस्ते दाम्पत्य गायब झाले. बाळूमामाच्या मंदिरापासून अपहरण केले, पुढे कर्नाटकातील चिंचणी मायाक्काचे दर्शन घेऊन ते सोलापूरला गेले. मुलाची आईसुद्धा फिरस्ती आणि दाम्पत्यही फिरस्ते त्यामुळे त्यांचा घरोबा कोठेच नाही. याचाच फायदा घेऊन अपहरण झाले. विशेष म्हणजे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाला सुखरूप आणता आले. अंधश्रद्धेत तो बळी जाऊ नये यासाठी पोलिसांनी ४८ तास विनाथांबा केलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले.
------
आई नाही पोलिसच आले...

मुलाने आई कोठे आहे, असे विचारले, की हे फिरस्ते दाम्पत्य तुझी आई पाठीमागून येत आहे, असे सांगत होते. तो मुलगाही आईकडे सोडाच म्हणून हट्ट करीत नव्हता. दुसऱ्या दिवशी सोलापुरात घरी गेल्यानंतर पुन्हा मुलाने विचारले, ‘आई कोठे आहे?’. त्यावेळी या दाम्पत्याने ती येणार असल्याचे सांगितले, मात्र तेथे आई नव्हे तर पोलिसच पोहचले आणि फिरस्त्या दाम्पत्याला बेड्या ठोकल्या.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com