
मनपा प्रशासक
दिवाळीत निवडणुकीची शक्यता
कोल्हापूर, ता. ८ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे महापालिका निवडणुकीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यावेळी काही निर्णय न होता सुनावणी लांबणीवर गेली तर निवडणूक पावसाळ्यानंतर दिवाळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समित्यांवरील प्रशासकांचा कालावधी आणखी काही वाढवला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे होऊन गेली आहेत. प्रशासकांचा कालावधी यापूर्वी वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी १७ मार्चला होणार आहे. त्यादिवशी सुनावणी झाल्यास त्यात न्यायालय काय आदेश देते की आणखी पुढील तारीख पडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जरी या महिन्याच्या अखेरीस निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली तर किमान तीन महिने लागणार आहेत. त्यात पावसाळा सुरू होणार असल्याने निवडणूक त्यानंतरच घेतली जाऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे.