रेल्ये भाग १०

रेल्ये भाग १०

रेल्‍वेसेवेची ‘कंजूषी’ एक्स्प्रेस भाग ः १०
-

हक्कांच्या सेवा ‘कंत्राटदारां’ना देण्याचा प्रयत्न; बहुतांशी प्रकल्प अर्धवट असल्याचे चित्र
-
खासगीकरणाचा ठेका, प्रवाशांना फटका

शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : रेल्वे प्रशासनाने आपल्या हक्कांच्या सेवा खासगी संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून खासगी कंत्राटदार सामान्य प्रवाशांकडून आर्थिक लुबाडणूक करत आहेत, तर बहुतांशी प्रकल्प अर्धवट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या खासगीकरणाचा प्रवाशांना त्रासच सोसावा लागत आहे. राज्यात एकूण जवळपास १६ रेल्वे स्थानकांवर खासगी कंपन्यांना चालवण्याचा घाट घातला आहे. यात कोल्हापूर रेल्वेस्थानकातही बहुतांशी सुविधा खासगी कंपन्यांनाच चालवण्यात देण्यात येणार आहेत. या खासगीकरणातून रेल्वेची कमाई आणि प्रवाशांची लूट, असेच घडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर रेल्वे कोकणला जोडण्यासाठी घोषणा झाली. वैभववाडी मार्गाची पाहणी दोन वेळेला झाली. १४०० कोटींचा आराखडा तयार केला आणि यंदा कोल्हापूर रेल्वे कोकणला जोडणार, असे गेल्या दहा वर्षांपासून सांगण्यात येते; पण पाहणी करण्यापुढे हा प्रकल्प पुढे सरकला नाही. दहा वर्षांत रेल्वेने खासगीकरणाचा सपाटा लावला. पहिल्यांदा स्वच्छतागृहे, रेल्वेची खाद्यसेवा, पार्किंगपाठोपाठ डार्मेट्री सेवाही खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रेल्वेची जागा, रेल्वेची पायाभूत सुविधा वापरण्यासाठी प्रवाशांनी पैसे द्यायचे, ते खासगी कंपनीने घ्यायचे आणि रेल्वेला थोडासा वाटा देऊन बहुतांश वाटा खासगी कंपन्यांनी घ्यायचा, असा डाव गेली पाच वर्षे खेळला जात असल्याची चर्चा आहे. यातही प्रवाशांची लूट होत आहे. याशिवाय, रेल्वेच्या पायाभूत सुविधा तयार करण्याचे कामही खासगी कंपन्यांनाच दिले जाते. त्यातही कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या निविदा निघतात. त्या मिळवण्यासाठी पडद्यामागे अर्थकारण होत असल्याचे बोलले जाते. परिणामी, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण काम होण्याऐवजी ते काम रेंगाळते, असा अनुभव कोल्हापूर ते पुणे मार्गावरील विविध पायाभूत सुविधांच्या कामावेळी आलेला आहे.
(समाप्त)

चौकट
कृषी माल वाहतूक सेवा मध्येच बंद
रेल्वेने कृषी माल वाहतूक सेवा कोरोना काळात सुरू केली. त्याला प्रतिसादही वाढत होता. याच सेवेला औद्योगिक माल वाहतुकीची जोड देण्यात येणार होती. मात्र, ती सेवा मध्येच बंद केली आणि शेतकरी, उद्योजकांची कोंडी केली. ही सेवा खासगी तत्त्वावर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
...
चौकट
रेल्वे जागेतील पार्किंगचा
ठेका खासगी संस्थेला

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील पार्किंगची सुविधा रेल्वेच्या जागेत आहे. या पार्किंगचा ठेका खासगी संस्थेला दिलेला आहे. या संस्थेकडून वाहधकारकांकडून दहा रुपये प्रमाणे शुल्क वसूल केले जाते. मात्र, दोन मिनिटांसाठी गाडीची चौकशी करायला आलेल्या एखाद्या प्रवाशाने आपली दुचाकी रेल्वे स्थानकासमोर लावली तरी दहा रुपये वसूल केले जातात. रेल्वेच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीकडूनही दोन-पाच मिनिटांसाठी दहा रुपये वसूल केले जात असल्याचे चित्र आहे.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com