शेतकरी संघ अतिक्रमण

शेतकरी संघ अतिक्रमण

शेतकरी संघाच्या भूखंडावर पोटकुळांचा ‘कब्जा‘

प्रशासकीय संचालकांची डोळेझाक : टिंबर मार्केटमधील मोक्याचा भूखंड

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ : शेतकरी सहकारी संघाच्या टिंबर मार्केट येथील मोक्याच्या सुमारे एक एकर भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पूर्वीच्या एका भाडेकरुचीच ही पोटकुळे आता या भूखंडावर कब्जा करुन बसल्याची चर्चा आहे. पोटकुळांनी केलेल्या कब्जाबद्दल संघाचे प्रशासकीय संचालक मंडळ आणि प्रशासनही डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या हितासाठी म्हणून पोटतिडकीने चर्चा करणारे काही जण आता मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी संघाची भरभराट व्हावी, संघाचा बसलेला बैल पुन्हा उभा रहावा. संघाच्या गावा-गावात शाखा आणि खत निर्मिती व्हावी, अशी स्वप्ने बाळगून वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाबद्दल कळवळा व्यक्त केला जातो. सभेपुरतेच मोठमोठी स्वप्न पाहत स्वत:च्या मनाची समजूत घालून सभासद सभेबाहेर पडतात. मात्र, सभासदांच्या स्वप्नांना आणि मागणीला हरताळ फासण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. शेतकरी संघाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी टिंबर मार्केट येथील मोक्याचा सुमारे एक एकरचा भुखंड आहे. या भूखंडावर संघाचे सांस्कृतिक भवन उभ रहावे, यातून संघाला चांगले उत्पन्न मिळू शकेल, अशी सभासदांकडून वारंवार मागणी होत होती. यातूनही हा भूखंड भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यापूर्वी हा भूखंड संघाच्याच एका माजी कर्मचाऱ्याला भाडे तत्वावर दिला. भूखंड घेतल्यानंतर ठरलेले भाडे देणे परवडत नसल्याने त्यानी हा भूखंड सोडला. पण, याच भाडेकरुंच्या काळात असणारी काही पोटकुळे आजही या भूखंडवर कब्जा करुन बसले आहेत. संघासोबत कोणताही करार नाही किंवा भाडेही दिले जात नाही. त्यामुळे बेकायदेशीररित्या कब्जा करुन बसलेल्यांमागे ‘गॉडफादर'' कोण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
....

तर संघाच्या जागा धोक्यात

संघाला उर्जितावस्था देण्याबाबत सभासदकांकडून मागणी होत आहे. याउलट संघाची मालमत्ता फुकट वापरली जात असताना प्रशासकीय मंडळाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे यापूर्वीचा अनुभव पाहता भविष्यात संघाच्या अशा मालमत्ता धोक्यात यायला वेळ लागणार नसल्याची परिस्थिती आहे.
....
‘पूर्वी ज्याला हा भूखंड भाड्याने दिला होता, त्याने त्याच्या अधिकारात काही लोकांना तिथे भाडेकरु म्हणून ठेवले आहे. संघाचा भूखंड त्यांनी सोडावा किंवा करार करुन त्याचे भाडे द्यावे यासाठी स्वत: त्यांना भेटून आणि समज देवून आलो आहे. आजही आमचे कर्मचारी गेले होते. पण संघाच्या भूखंडावर कोणीही कब्जा केलेला नाही आणि करुही देणार नाही.
-सुरेश देसाई, प्रशासकीय अध्यक्ष, शेतकरी संघ
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com