पं.पन्नालाल घोष स्मृती महोत्सव बातमी

पं.पन्नालाल घोष स्मृती महोत्सव बातमी

89319

गुरू-शिष्याचे नाते उलगडणारे पं. घोष स्मृती संमेलन

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शास्त्रीय बासरी वादनाचा एकल (सोलो) प्रयोग करणे तसे धाडसाचेच; पण प्रसिद्ध बासरी वादक सचिन जगताप यांनी पं. पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचे आयोजन करून हे शिवधनुष्य पेलले. गुरूंच्या शब्दाखातर गेली २१ वर्षे ते या संमेलनाचे आयोजन करतात. यामध्ये त्यांनी देशातील नामवंत बासरी वादकांना सन्मानित केलेच. शिवाय त्यांच्या बासरी वादनाने कोल्हापूरकरांच्या मनःपटलावर कायम रुंजी घालणाऱ्या स्मृती कोरून ठेवल्या.
सांगलीमधील पं. हरिशचंद्र कोकरे हे जगतापांचे गुरू. पं. पन्नालाल घोष हे कोकरे यांचे गुरू. त्यांच्या नावाने कोकरे यांनी ४८ वर्षे सांगलीमध्ये संगीत महोत्सवाचे आयोजन केले. आपल्या गुरूंच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून सचिन यांच्या खांद्यावर या महोत्सवाची धुरा त्यांनी ठेवली. छोटेखानी मैफलीतून ही परंपरा सुरू राहावी एवढाच त्यांचा उद्देश होता; मात्र सचिन जगताप यांनी आपल्या कल्पकतेने एक सांगीतिक संमेलन सुरू केले. २००० मध्ये सुभाष नागेशकर यांच्या घरामध्ये सुरू झालेल्या या संगीत संमेलनाला आता केवशराव भोसले नाट्यगृह कमी पडू लागले आहे. कोणाचीही मदत न घेता केवळ स्वतःच्या हिंमतीवर जगताप हा कार्यक्रम करतात. यामध्ये देशातील नामवंत बासरी वादकांना पं. पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरवले जाते. तसेच त्या वादकाचे वादनही होते. बासरी हे केवळ साथसंगतीचे वाद्य असा समज पूर्वी होता; मात्र त्याला छेद देत जगताप यांनी कोल्हापुरात बासरीला स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. या माध्यमातून एकल बासरी वादनाची मैफल होते. आजपर्यंत या महोत्सवात पं. नित्यानंद हळदीकर, पं. राकेश चौरसिया, पं. प्रवीण घोडखिंडी, पं. रोणू मुजमदार, अमर ओक, रुपक कुलकर्णी अशा ख्यातनाम बासरी वादकांना गौरवले आहे. यावर्षी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हे संगीत संमेलन आता सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचे पान बनले आहे.

चौकट
पं. पन्नालाल घोष यांचे सांगीतिक योगदान
पश्चिम बंगालमधील पं. पन्नालाल घोष हे ख्यातनाम बासरी वादक होते. त्यांनी दीपावली, हंसकिंकिणी अशा रागांची निर्मिती केली. त्यांनी बासरीच्या एकल (सोलो) वादनाच्या मैफलींना प्रारंभ केला. यासाठी त्यांनी पांढरी ३ स्केलची बासरी स्वतः तयार केली. त्यांनी घडवलेले अनेक बासरी वादक आज देशात आणि परदेशातही संगीत सेवा करत आहेत.

कोट
माझ्या गुरूंनी मला हे संगीत संमेलन सुरू ठेवण्यास सांगितले. त्यांचा शब्द प्रमाण मानून मी याचे आयोजन करतो. यंदा पुरस्कार देण्यासाठी पं. पन्नालाल घोष फाउंडेशनची स्थापना केली आहे. पुढील वर्षापासून बासरी बनवणाऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्याचा मानस आहे.
-सचिन जगताप, प्रसिद्ध बासरी वादक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com