राजर्षी शाहूंनी सर्वंकष मानवी विकासाचा कृतीशील विचार मांडला

राजर्षी शाहूंनी सर्वंकष मानवी विकासाचा कृतीशील विचार मांडला

फोटो-89286
.........


राजर्षींनी मांडला सर्वंकष मानवी
विकासाचा कृतीशील विचार

भालचंद्र मुणगेकर; शिवाजी विद्यापीठात स्मृती शताब्दी परिषदेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ ः'' महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्रस्थापना करणारे राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक केल्याखेरीज तरणोपाय नाही, हे त्यांना समजले होते. म्हणूनच १९१७ साली त्यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यांच्या कारकीर्दीच मानवी भांडवलात गुंतवणुकीची अशी अनेक उदाहरणे दिसतील. त्यामुळे सर्वंकष मानवी विकासासाठी ते आग्रही असल्याचे दिसते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणात ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहातील या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के होते.
‘राजर्षी शाहूंचे अर्थकारण आणि त्याची विद्यमान प्रासंगिकता’ या विषयाच्या अनुषंगाने डॉ. मुणगेकर यांनी मांडणी केली. ते म्हणाले, ‘राजर्षी शाहूंनी राजकीय अर्थकारणाच्या आधारेच लोककल्याणाची अनेकविध कामे मार्गी लावली. त्यातून शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचित, दलित अशा समग्र घटकांना सामाजिक न्याय प्रदान केला. भांडवलशाहीतील आर्थिक केंद्रीकरणाला विरोध करणारे त्या काळातील देशामधील एकमेव संस्थानिक म्हणजे शाहू महाराज होत. त्यांचा भर विकेंद्रीकरणावर होता.’
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘पुरोगामी विचारांवर हल्ले होत असताना त्यांचा आक्रमक विचारांनी प्रतिरोध केला जाणे गरजेचे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे चक्र पूर्ण होऊन नव्याने पुरोगामी विचारपरंपरा प्रस्थापित होणे आवश्यक आहे.’
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याचा एक महत्त्वाचा धडा राजर्षी शाहूंनी आपल्याला दिला. त्या मार्गावरुन चालण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा आदी बाबींचा समावेश असायला हवा.’
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले.
........

ऋण मानत नसल्याचा मोठा पेच

‘आज अनेकजण फुले, शाहू, आंबेडकरांचे ऋण मानत नाहीत, हा एक मोठाच पेच आहे. हा पेच सोडविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आज आपण खूप सुरक्षित राहू लागलो आहोत.धोका पत्करल्याखेरीज कोणतेही सामाजिक प्रबोधन करता येणार नाही’, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com