महापालिका कर्मचारी

महापालिका कर्मचारी

महापालिका कर्मचारी
राज्य संपातून बाहेर
काळ्या फिती लावत आज कामावर

कोल्हापूर, ता. १५ ः राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करून तोडगा काढण्याबाबतचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिले. त्यामुळे राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी उद्या (ता. १६) पासून राज्यव्यापी संपातून बाहेर पडत आहेत; मात्र ते काळ्याफिती लावून काम सुरू करतील, असे पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आज रात्री दिले. ही माहिती कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुंद्रे, सरचिटणीस दिनकर आवळे, अजित तिवले यांनी आज रात्री येथे दिली.
दरम्यान, या चौघांनी महापालिका कर्मचाऱ्यांना उद्यापासून कामावर हजर राहण्याचे आवाहन रात्री उशिरा केले. त्यामुळे साडेतीन हजार कर्मचारी कामावर हजर होणार असून शहरातील सफाई, कचरा उठावपासून महापालिकेच्या सर्व सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत.
राज्यव्यापी संपात महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाल्याने ऐन मार्च अखेरची लगबग सुरू असताना मंगळवारपासून प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. शिवाय कचरा उठाव, सफाई आदी सेवा बंद राहिल्या. परिणामी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
कोल्हापूर महापालिका कर्मचारी महासंघाने सांगितले, की कचरा उठाव व स्वच्छतेच्या प्रश्‍नांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने कर्मचारी संघाने आज फेडरेशनबरोबर चर्चा केली होती. फेडरेशननेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. चर्चेसाठी लवकरच वेळ देण्यात येईल, असे पत्र दिले. त्यानुसार फेडरेशनने राज्यातील सर्व कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून केवळ महापालिकेतील कर्मचारी संपातून बाहेर पडतील, असा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही दिले
फेडरेशनच्या आदेशानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावे, असे आवाहन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. कालपासून प्रशासनाकडून जुनी पेन्शन लागू असलेले तसेच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कामावर यावे, यासाठी पत्र दिले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी दाद दिली नसल्याने शेवटी खासगी कर्मचारी घेण्याचे नियोजन केले होते. तसेच मार्च अखेरला पंधरा दिवसच राहिले असल्याने घरफाळा, पाणीपट्टी वसुलीचे मोठे आव्हान समोर असल्याने प्रशासनाकडूनही जोर लावला जात होता. या पार्श्‍वभूमीवर संपातून कर्मचारी बाहेर पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com